UNPREDICTABLE आणि शरद पवार या दोन्ही शब्दांचे अर्थ एकच

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 27 नोव्हेंबर 2019

80 वर्षांच्या पैलवानाने 80 तासांत पाडलं सरकार !

बाप बाप असतो, हे आता पुन्हा एकदा चर्चिलं जातंय. महाराष्ट्राच्याच नव्हे तर देशाच्या राजकारणातला बाप माणूस म्हणून शरद पवार यांच्याकडे पाहिलं जातंय. आधी निवडणूक प्रचाराचं मैदान मारलं. त्यानंतर अल्पावधीत सरकार पाडलं. अशी सगळी किमया या बाप माणसाला कशी जमली?

अजित पवारांच्या बंडाने महाराष्ट्रात राजकीय भूकंप आला. राजकीय वातावरण ढवळून निघालं. पण शरद पवारांनी राजकारणातला बाप माणूस कोण आहे, हे पुन्हा दाखवून दिलं. 80 वर्षांच्या या पैलवानाने 80 तासांतच फडणवीस सरकारला चितपट केलं आणि भाजपला धूळ चारली!

अजित पवारांच्या बंडानंतरही शरद पवारांच्या मनात किंचितही चलबिचल नव्हती. पत्रकार परिषदेत त्यांनी राष्ट्रवादीच्या आमदारांना खेचून आणलं. नेमकं काय घडलंय, हे अक्षरशः वदवून घेतलं.

शरद पवार जे बोलतात, ते कधीच करत नाही, याची प्रचिती महाराष्ट्राच्या जनतेला अनेकदा आलेली आहे. यावेळीही पवारांनी तेच केलं. शिवसेनेला सोबत घेतलं. त्यानंतर अखेरपर्यंत शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या सगळ्या आमदारांना सांभाळलं. 

शरद पवार हॉटेलमध्ये जाऊन आमदारांना वेळोवेळी भेटत होते. बैठकांचा जोर सुरुच होता. या राजकीय धामधुमीतही शरद पवार कराडला गेले. यशवंतराव चव्हाणांना आदरांजली वाहिली. शेकडो मैल प्रवास करुन शरद पवार थकले नाही. राजकीय भूकंपाचे धक्के पचवत असतानाही, त्यांनी बाप कसा असतो?, हे दाखवून दिलं. 

आता थोडासा फ्लॅशबॅकही पाहुयात...  

  • हिवाळी अधिवेशनाचा पहिलाच दिवस.. शरद पवार नरेंद्र मोदींना भेटले..
  • यानंतर लगेचच मोदींनी शहांची भेटही घेतली..
  • या भेटीत काय झालं असेल?  
  • संजय राऊत एकदा-दोनदा नाही तर वेळोवेळी शरद पवारांच्या संपर्कात राहिले!
  • त्याआधी सातत्यानं शरद पवार एकच गोष्ट बोलत राहिले.. आम्हाला विरोधात बसण्याचं मॅन्डेट मिळालं, आम्ही विरोधात बसणार
  • विरोधात बसणार नाही ते महाराष्ट्र विकास आघाडीत सरकार स्थापनेपर्यंतचा प्रवास शरद पवार या बापमाणसामुळेच शक्य झालंय. 

या बाप माणसाने आपला झंझावात दाखवण्याची खरी सुरुवात केली, ती साताऱ्यातल्या ऐतिहासिक सभेने. पायाची जखम भळभळत होती. तरी गडी चालत राहिला. वय वर्ष 80, पण एखाद्या तरुणाला लाजवेल, असा महाराष्ट्र पिंजून काढला. अनेकांनी साथ सोडली पण बाप माणसाने लढणं सोडलं नाही. 

कॅन्सरमधून आता कुठे शरीर बरं होतं होतंय. पण पवारांना त्याची फिकीर नव्हती. कारण लोकांमध्ये मिसळणं, हार न मानणं आणि शेवटपर्यंत लढत राहणं, एवढंच पवारांना माहितीय! 

विधानसभा निवडणुकीत भाजपने राष्ट्रवादीला सुरुंग लावला. मेगाभरतीच्या नावाखाली अख्खा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फोडला. पण तरीही भाजप पवारांना रोखू शकली नाही!

2014 पासून असलेल्या मोदी लाटेला पवारांनी थेट आव्हान दिलंय. फक्त मोदीच काय देशातल्या भल्याभल्यांना पवारांनी दणका दिलाय. इंदिरा आणि सोनियांची हवा असतानाही पवारांनी गांधी परिवालाही थेट आव्हान दिलं होतं. सोनियाच काय, पवार तर थेट इंदिरा गांधींशीही भिडले. प्रस्थापित चेहऱ्याविरोधात लढणं हे पवारांना तेव्हापासूनच माहितीये. UNPREDICTABLE आणि शरद पवार या दोन्ही शब्दांचे अर्थ एकच आहेत.

म्हणूनच या 80 वर्षीय झंझावाती तरुणाला राजकारणातला बाप माणूस म्हणतात, ते उगाच नाही!

Web Title : thats why sharad pawar is called as father of maharashtra


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: thats why sharad pawar is called as father of maharashtra