
शहरातील खासगी सुरक्षा रक्षक उपेक्षित
वाशी - नवी मुंबईतील खासगी, सरकारी आणि निमसरकारी कार्यालयांसह इतरही ठिकाणी काम करणाऱ्या खासगी सुरक्षा रक्षकांना त्यांच्या कामाचा योग्य मोबदला मिळत नसून अनेक ठिकाणी तर त्यांना साप्ताहिक सुटीही नाकारली जाते. त्यामुळे सुरक्षा रक्षकांना विविध अडचणींचा सामना करावा लागतो. शहरातील विविध खासगी सुरक्षा रक्षक संस्थांकडे हजारो सुरक्षारक्षक काम करतात. त्यात तरुणांसह साठी ओलांडलेल्या ज्येष्ठ नागरिकांचाही समावेश आहे. त्यांना विविध कंपन्या, कारखाने, दवाखाने, खासगी, सरकारी, निमसरकारी कार्यालये, निवासी संकुले, शोरूम, आणि बार-रेस्टॉरन्ट आदी ठिकाणी तैनात केले जाते. कामावर रुजू होताना त्यांना चांगल्या मोबदल्याचे प्रलोभन दाखवले जाते. परंतु हाती तुटपुंजी रक्कम ठेवली जाते.
विशेष म्हणजे या संस्थांना संबंधित आस्थापनांकडून महिन्याला २० ते २५ हजार रुपये मिळतात. त्या प्रमाणात सुरक्षा रक्षकांना मोबदला मिळणे अपेक्षित आहे, मात्र तसे होत नसल्याचे काही सुरक्षा रक्षक सांगतात.
सुविधा कागदोपत्रीच
सुरक्षा रक्षकांना सरकारी नियमानुसार आरोग्य विमा, भविष्य निर्वाह निधी, आरोग्याच्या इतरही सुविधा आणि किमान वेतन देणे बंधनकारक असते. प्रत्यक्षात काही संस्थांचा अपवाद वगळता बहुतांश संस्थांमधील सुरक्षा रक्षकांना या सुविधा फक्त कागदोपत्री पुरवल्या जात असल्याच्या तक्रारी आहेत.
आरोग्य तपासणी नाही
सुरक्षा रक्षकांची नोंदणी करताना त्यांची आरोग्य तपासणी केली जात नाही. शारीरिक तंदुरुस्तीकडेही दुर्लक्ष केले जाते. त्यांच्याकडून आधारकार्ड किंवा कोणताही पुरावाही संस्था घेत नाही.
या संस्थानी सुरक्षा रक्षकांची नोंदणी करताना नियमाप्रमाणे पूर्ण वैयक्तिक माहिती घेणे आवश्यक आहे. पोलिसांचे ना हरकत प्रमाणपत्रही गरजेचे आहे. त्यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी असेल तर त्याला नियुक्त करता येत नाही. मात्र याकडे सर्रास दुर्लक्ष होत आहे.
Web Title: The City Private Security Guards Neglected
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..