Mumbai : उड्डाणपुलाचा पहिला गर्डर यशस्वीरित्या टाकला! संपूर्ण काम डिसेंबरपर्यंत

mumbai
mumbai

मुंबई : विद्याविहार रोड ओव्हर ब्रिजच्या बांधकामासाठी पहिला ओपन वेब गर्डर यशस्वीपणे टाकण्यात आले आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या एन विभाग हद्दीत, पूर्व आणि पश्चिम यांना जोडणारा विद्याविहार रेल्वे स्थानकावरून जाणारा उड्डाणपूल बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने बांधण्यात येत आहे. या उड्डाणपुलासाठी तब्बल १,१०० मेट्रिक टन वजन असणारा सुमारे १०० मीटर लांबीचा पहिला गर्डर यशस्वीपणे स्थापन करण्यात आला आहे.

एन विभाग हद्दीत, घाटकोपर परिसरात पूर्वेकडील रामचंद्र चेंबूरकर आणि पश्चिमेकडील लालबहादूर शास्त्री मार्ग यांना जोडण्यासाठी विद्याविहार रेल्वे स्थानक रुळांच्या वरून जाणारा उड्डाणपूल बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या पूल विभागाच्या वतीने बांधण्यात येत आहे.

या उड्डाणपुलाच्या निर्मितीमध्ये रेल्वे रुळांवरून जाणारा सुमारे १०० मीटर अंतराचा मुख्य पूल समाविष्ट आहे. हा पूल बांधताना दोन्ही बाजूच्या वाहतुकीसाठी प्रत्येकी एक असे दोन स्टील गर्डर स्थापन करावे लागणार आहेत. या गर्डरचे वैशिष्ट्य म्हणजे ते भारतातील रेल्वेवरील आतापर्यंतचे सर्वाधिक असे प्रत्येकी ९९.३४ मीटर लांब व ९.५० मीटर रुंद गर्डर आहेत. त्यांचे वजन प्रत्येकी सुमारे अकराशे मेट्रिक टन आहे. या दोन खुल्या स्टील गर्डरची रेल्वे मार्गावर टप्प्याटप्प्याने उभारणी करण्यात येत आहे.

सदर गर्डरची कामे रेल्वे प्रशासनासोबत समन्वय साधून लवकर पूर्ण करावीत, अशी सूचना महानगरपालिका आयुक्त इकबाल सिंह चहल आणि अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) पी. वेलरासू यांनी अलीकडे झालेल्या बैठकीत केली होती. त्यानुसार, या दोनपैकी पहिला गर्डर काल शनिवार मध्यरात्रीनंतर १.२० वाजता ते रविवारी पहाटे ४.२० वाजता यशस्वीपणे स्थापन करण्यात आला आहे.

पहिला गर्डर बसवण्यासाठी मध्य रेल्वेने मेगाब्लॉक मंजूर केला होता. त्या वेळेत गर्डर स्थापन करण्याचे काम विंच पुलिंग पद्धतीने पूर्ण करण्यात आले. प्रारंभी सदर गर्डर पूर्व बाजूकडून पश्चिम दिशेला सरकवत, रेल्वे रुळांच्यावर मधोमध आणण्यात आला. आता येत्या दोन-तीन दिवसात उत्तरेकडे सरकवून तो स्थित करण्यात येईल. तसेच, दुसरा गर्डर स्थापन करण्याचे काम देखील लवकरच हाती घेण्यात येणार आहे.

विशेष म्हणजे या गर्डरला मधोमध आधार न ठेवता अर्थात विनाखांब एकसंघपणे त्याची उभारणी केली जात आहे. एकूणच हा अभियांत्रिकी क्षेत्रातला अविष्कार आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या अभियंत्यांनी आजवर वेगवेगळे आव्हानात्मक प्रकल्प यशस्वीपणे पूर्ण करून दाखवले आहेत. सदर गर्डरची यशस्वी स्थापना ही देखील महानगरपालिकेच्या अभियांत्रिकी यशस्वी कामगिरीतील नवीन टप्पा ठरला आहे.

संपूर्ण काम डिसेंबरपर्यत

पहिल्या गर्डरनंतर दुसरा गर्डर स्थापनेचे काम लवकरच मार्गी लावण्यात येईल. त्यानंतर दुसर्‍या टप्प्यामध्ये पुलाच्या पूर्व व पश्चिम बाजूंकडील १७.५० मीटर रुंदीच्या पोहोच रस्त्यांचे काम करण्यात येईल. प्रकल्पाचे संपूर्ण काम डिसेंबर २०२४ पर्यंत पूर्ण करण्याचे महानगरपालिका प्रशासनाचे नियोजन आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com