esakal | मुंबईकरांनो काळजी घ्या! मलेरिया फोफावतोय, जुलै महिन्यात रुग्णांमध्ये दुपटीने वाढ...महापालिकेचे आवाहन
sakal

बोलून बातमी शोधा

malaria patients

मुंबईत गेल्या वर्षी जुलै महिन्यात 438 मलेरियाचे रूग्ण सापडले होते. यंदा ही संख्या दुप्पट झाली आहे. यंदा जुलै महिन्यात मलेरियाचे 872 रुग्ण सापडले आहेत. मुंबईत मलेरियापाठोपाठ डेंग्यूचे रुग्णही आढळले आहेत.

मुंबईकरांनो काळजी घ्या! मलेरिया फोफावतोय, जुलै महिन्यात रुग्णांमध्ये दुपटीने वाढ...महापालिकेचे आवाहन

sakal_logo
By
भाग्यश्री भुवड

मुंबई : मुंबईत दिवस रात्र कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी कामाला लागलेल्या मुंबई महापालिकेकडून आता मुंबईकरांना पुन्हा एकदा काळजी घेण्याचे आवाहन केले गेले आहे. कारण, मुंबईत कोरोना पाठोपाठ मलेरिया ही वेगाने पसरतोय. 20 जुलैनंतर मलेरियाच्या रुग्णांमध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत मोठी वाढ झाली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदाच्या जुलै महिन्यात मलेरियाचे रुग्ण दुपटीने वाढले आहेत. 

मुंबईत गेल्या वर्षी जुलै महिन्यात 438 मलेरियाचे रूग्ण सापडले होते. यंदा ही संख्या दुप्पट झाली आहे. यंदा जुलै महिन्यात मलेरियाचे 872 रुग्ण सापडले आहेत. मुंबईत मलेरियापाठोपाठ डेंग्यूचे रुग्णही आढळले आहेत. गेल्यावर्षी जुलैमध्ये मुंबईत डेंग्यूचे 29 रुग्ण सापडले होते. जुलैमध्ये 11 रुग्ण सापडले आहेत. डेंग्यू रुग्णांची संख्या कमी असली तरी डेंग्यूचेही रुग्ण सापडत असल्याने प्रशासनासमोर मोठं आव्हान उभं राहिलं आहे. त्यामुळे, मलेरिया आणि डेंग्यूच्या रुग्णांना कोरोनाचा संसर्ग होऊ नये, म्हणून रुग्णालयांना विशेष काळजी घ्यावी लागणार आहे. 

मुंबईचे महापौर किशोरी पेडणेकर म्हणाल्या, मलेरियाचे रुग्ण सापडत आहेत. त्यामुळे, आता पालिकेकडून मलेरिया आणि डेंग्यूच्या अळ्या निर्माण होऊ नयेत, म्हणून झोपडपट्ट्या आणि सोसायट्यांमध्ये फवारणी केली आहे. अडगळीतील सामानही हटवण्यात आले आहे. मात्र, बांधकांमांच्या ठिकाणी पालिका कर्मचाऱ्यांना फवारणी करण्यास मज्जाव केला जातो. त्यामुळे त्या ठिकाणी फवारणी होत नाही, परिणामी मलेरिया आणि डेंग्यूच्या अळ्या निर्माण होतात. 
 
पावसाळी आजारांसाठी पालिका रुग्णालये सज्ज... 

या पार्श्वभूमीवर, पालिकेच्या प्रमुख रुग्णालयांसह पेरिफेरल रुग्णालयांमध्ये पावसाळी आजारांसाठी दिड हजारांवर बेड्सची सोय करण्यात आली आहे. मलेरिया, डेंग्यूचे डास होऊ नये, म्हणून पालिकेकडून फवारणी केली जात आहे. पण, नागरिकांनी पाणी साचू देऊ नये, यासाठी प्रयत्न करावेत. ताप, डोकेदुखी, उलटी, थकवा अशी काही लक्षणे आढळली तर त्वरित डॉक्टरांचा सल्ला घेऊन उपचार घ्यावेत. 


वर्ष - मलेरिया रुग्ण
जुलै 2020 - 872
जुलै 2019 - 438

वर्ष - डेंग्यू रुग्ण 
जुलै 2020 - 11
जुलै 2019 - 29

वर्ष - लेप्टो 
जुलै 2020 - 14
जुलै 2019 - 74


स्वाईन फ्लूचा एक ही रुग्ण नाही...

दरम्यान, पावसाळा सुरू झाल्यापासून आतापर्यंत स्वाईन फ्लूचा अजून एक ही रुग्ण आढळलेला नाही. गेल्या वर्षी जुलै महिन्यात स्वाईन फ्लूचे 123 रुग्ण आढळले होते. मात्र, ही संख्या या महिन्यात शुन्य आहे. गेस्ट्रोच्या रुग्णांमध्ये ही हळूहळू वाढ होत असून 53 रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे, कोरोनापासून बचाव करता करता आता मुंबईकरांना पावसाळी आजारांपासून वाचवणे हे देखील आवाहन पालिकेसमोर आहे.


संपादन - सुस्मिता वडतिले 

loading image