समाजमाध्यमांशी ‘आधार’ची जोडणी नकोच!

social media
social media

मुंबई : सोशल नेटवर्किंग खात्यांशी जोडल्यास आधार क्रमांकाचा गैरवापर किंवा माहिती हॅक होण्याची शक्‍यता आहे. त्याऐवजी ‘मॅक आयडी’ आणि ‘आयपी ॲड्रेस’ वापरण्यासाठी मोबाईल क्रमांक सक्तीचा करावा, असा सल्ला सायबर सुरक्षा क्षेत्रातील तज्ज्ञांनी दिला आहे. परदेशांतून वापरल्या जाणाऱ्या ‘फेक अकांऊट’वर कसा अंकुश ठेवणार, असा प्रश्‍नही तज्ज्ञ उपस्थित करत आहेत. डार्कनेटच्या माध्यमातून बेकायदा कृत्ये चालतात. ‘मॅक आयडी’ मोबाईल क्रमांकाशी जोडल्यास डार्कनेटच्या वापरालाही चाप लावता येईल, असे तज्ज्ञांनी सुचवले आहे.

समाजमाध्यमांचा गैरवापर खोट्या बातम्या, दहशतवाद आणि पोर्नोग्राफीसाठी होऊ नये म्हणून प्रत्येक खाते आधार कार्डशी जोडावे, असे सर्वोच्च न्यायालयाने सुचवले आहे. त्यामुळे आधार कार्डमधील माहितीचा गैरवापर होण्याची भीती या क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केली. समाजमाध्यमावरील खाते हॅक झाल्यास आधार कार्डमधील माहितीचा गैरवापर होऊ शकतो. प्रत्येक मोबाईल क्रमांक आधार कार्डशी जोडलेला आहे. त्यामुळे सर्व समाजमाध्यम खाती आणि ‘आयपी ॲड्रेस’ व ‘मॅक आयडी’ मोबाईलशी जोडल्यास संशयास्पद व्यक्तीला शोधणे अवघड होणार नाही, असा दावाही तज्ज्ञांनी केला.

आधार कार्ड समाजमाध्यमांशी लिंक करण्यास तरुणांनी विरोध दर्शवला आहे. फेक न्यूज, ट्रोलिंगवर अंकुश हवा; मात्र त्यासाठी अन्य पर्याय शोधण्याची गरज आहे, असे मत तरुणाईने व्यक्त केले. आधार कार्डाच्या सुरक्षेबद्दल सध्या आक्षेप घेतला जात आहे. त्यात आधार कार्ड समाजमाध्यमांशी जोडल्यास वैयक्तिक माहितीच्या सुरक्षेचा प्रश्‍न बिकट होईल, असे बोलले जात आहे.
मोबाईल क्रमांक जोडणे योग्य आधार क्रमांक समाजमाध्यम खात्यांशी जोडल्यास वैयक्तिक सुरक्षा आणि गोपनीयतेचा प्रश्‍न उभा राहू शकतो, असे मत सायबर सुरक्षा क्षेत्रातील तज्ज्ञ अंकुर पुराणिक यांनी व्यक्त केले. त्याऐवजी मोबाईल क्रमांक जोडणे शक्‍य आणि फायद्याचे असल्याचे त्यांनी सांगितले. 

समाजमाध्यमांवरील ट्रोलिंग, फेक न्यूज, बनावट खाती असे प्रकार बंद झालेच पाहिजेत. परंतु, आधार कार्डमधील आमची वैयक्तिक माहिती हॅक झाल्यास तिचा गैरवापर होऊ शकतो. त्यामुळे मनात सतत धाकधुक राहील. 
- सुप्रिया मानजी, चेंबूर 

समाजमाध्यमांशी जोडल्यास आधार कार्डचा गैरवापर होऊ शकतो. सध्या आधार कार्डच्या माहितीचा गैरवापर होत असल्याची चर्चा आहे. त्यात समाजमाध्यमांशी जोडल्यास आधार कार्डवरील माहिती हॅक करून त्या आधारे नवी खाती उघडली जातील. 
- कल्याणी कानडे, दादर 

हा व्यक्तिस्वातंत्र्यावर गदा आणण्याचा प्रकार आहे. त्यामुळे नागरिकांच्या बोलण्याच्या स्वातंत्र्यांवर निर्बंध येऊ शकतात. एखादे सोशलमीडिया खाते बनावट असल्यास, ते बंद करता येऊ शकते.
- हर्षद माने, समाजमाध्यम अभ्यासक 

आधार क्रमांक समाजमाध्यमांशी लिंक केल्यामुळे व्यक्तिस्वातंत्र्यावर गदा येईल, असे वाटत नाही. परंतु, हा निर्णय कितपत यशस्वी होईल, हा प्रश्‍न आहे. जगभरातील अब्जावधी नागरिक सोशलमीडियाचा वापर करतात. ती सर्व खाती आधारशी कशी जोडणार? परदेशांतही फेक अकांऊट उघडून त्यांचा वापर केला जाऊ शकतो. 
- माधव शिरवळकर, माहिती तंत्रज्ञान उद्योजक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com