'या' महिला नेत्यांची लागणार नव्या मंत्रिमंडळात वर्णी ?

संजय डाफ
शनिवार, 16 नोव्हेंबर 2019

  • कसं असेल नवीन मंत्रिमंडळ ? 
  • कुणाची लागणार महाशिवआघाडीच्या मंत्रिमंडळात वर्णी ? 

महाराष्ट्रात विधानसभेचे निकाल लागले आणि तीस वर्षांची युती निकाली निघण्याच्या मार्गावर आहे. महाराष्ट्रात घडलेलं राजकीय नाट्य सर्वांनी अगदी जवळून पाहिलं. महाराष्ट्रातील जनतेने कुणालाही एकहाती सत्ता दिलेली नाही. दरम्यान, शिवसेना आणि भाजपात मुख्यमंत्रिपदावरून फाटलंय. अशात आता महाशिवआघाडी म्हणजेच शिवसेना राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेस मिळून भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी महाराष्ट्रात सत्ता स्थापन करतील हे आता जवळ जवळ निश्चित झालंय. त्यामुळे आता चर्चा रंगू लागल्यात त्या महाशिवआघाडीच्या मंत्रिमंडळाच्या. 

दरम्यान आता या मंत्रिमंडळात महाशिवआघाडीच्या 'या' महिला नेत्यांची वर्णी लागू शकते असे संकेत सूत्रांकडून मिळतायत. यात प्रामुख्याने राष्ट्रवादीच्या रुपाली चाकणकर, कॉंग्रेसच्या यशोमती ठाकूर आणि शिवसेनेच्या डॉ. निलम गोऱ्हे यांची नावं चर्चेत आहेत.  

रुपाली चाकणकर या राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षप आहेत. पुण्यातील त्यांचं काम आणि विधानसभेआधी महाराष्ट्रभरात केलेला राष्ट्रवादीचा प्रचार यामुळे चाकणकर याचं नाव आघाडीवर आहे.

तर इकडे कॉंग्रेसच्या गोटातून कॉंग्रेसच्या कार्यकारी अध्यक्षा यशोमती ठाकूर यांचं नाव देखील चर्चेत आहे. भाजपच्या लाटेत अनेकांनी भाजपला सोडचिठ्ठी दिली. अशातही यशोमती ठाकूर टिकून राहिल्या आणि त्यांनी जिंकून दाखवलं.

तर शिवसेनेकडून डॉ. निलम गोऱ्हे यांची वर्णी मंत्रिमंडळात लागण्याची शक्यता आहे. नीलम गोऱ्हे या विधानसभेच्या उपसभापती आहेत. महिलांच्या प्रश्नांना डॉ, निलम गोऱ्हे यांनी कायम वाचा फोडण्याचा प्रयत्न केलाय.  

भाजपला वगळून राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादीशी घरोबा करणाऱ्या शिवसेनेला नवी मैत्री फायदेशीर ठरणार असल्याचंच दिसतंय. कारण काँग्रेस-राष्ट्रवादी, शिवसेनेत सत्तावाटपाचा फॉर्म्युला निश्चित झाल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. नव्या फॉर्म्युल्यानुसार शिवसेनेला पूर्ण पाच वर्षे मुख्यमंत्रिपद मिळणार असून काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसला उपमुख्यमंत्रिपद मिळणार आहे. तर, अन्य महत्त्वाच्या पदांचं वाटप समसमान होणार आहे. 

मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रिपदानंतर उरलेल्या खात्यांचं वाटप 16-14 -12 असं होणार आहे. शिवसेनेला १६, राष्ट्रवादी काँग्रेसला १४ तर काँग्रेसला १२ मंत्रिपदं मिळणार आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार, महत्त्वाच्या खात्यांपैकी गृहखातं राष्ट्रवादीच्या वाट्याला येणार आहे. तर, विधानसभा अध्यक्षपदासह महसूल हे खातं काँग्रेसला मिळणार आहे असं देखील सूत्रांकडून समजतंय.  

Webtitle : these women may get ministry in new Maharashtra cabinet 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: these women may get ministry in new mahashivaaghadi cabinet