मस्टर गाठण्यासाठी ते उतरतात रुळावर 

मस्टर गाठण्यासाठी ते उतरतात रुळावर 

दिवा : ऑफिसमधले मस्टर चुकू नये, यासाठी जिवावर उदार होऊन रुळांवर उतरून विरुद्ध दिशेने येणारी लोकल पकडण्याची कसरत करणे दिव्यातील नागरिकांच्या नशिबी आले आहे; पण हा प्रकार अत्यंत धोकादायक असून येथे कधीही दुर्घटना घडू शकते. 

दिवा स्थानकात आलेल्या लोकलचे दरवाजे ठाण्याला उतरणाऱ्या प्रवाशांनी अडवलेले असतात, असा दिव्यातील नागरिकांचा आक्षेप आहे. त्यामुळे अनेक प्रवाशांना या स्थानकातून लोकलमध्ये चढताच येत नाही. त्यामुळे त्यापैकी अनेकांनी फलाटाच्या विरुद्ध बाजूला म्हणजे थेट रेल्वे ट्रॅकवर उतरून लोकलमध्ये शिरकाव करण्याचा धोकादायक मार्ग स्वीकारला आहे. 

अशा वेळी त्या रुळावरून धडाडत जाणाऱ्या मेल एक्‍प्रेस आणि जलद लोकलचा धक्का लागण्याचा धोका त्यांना असतोच. याची कल्पना या प्रवाशांना असूनही ते हा मार्ग अवलंबतात. उदाहरणार्थ, दिव्यात फलाट क्रमांक 2 वर रोज सकाळी 8.30 वाजता मुंबईकडे जाणारी सेमी फास्ट लोकल पकडण्यासाठी प्रवासी रेल्वेमार्गावर उतरलेले दिसतात. कधी कधी त्याचवेळी कल्याणला जाण्यासाठी एलटीटी-भागलपूर ही एक्‍स्प्रेस वा जलद लोकल फलाट 3 वर आल्यास प्रवाशांची भंबेरी उडते. 

रोज दिसणारे चित्र रेल्वेच्या सीसी टीव्ही कॅमेऱ्यात कैद होत असतानाही रेल्वेकडून कोणतीही कार्यवाही होत नसल्याचे प्रवासी सांगतात. कदाचित त्यांनाही या असहाय प्रवाशांच्या कसरतीची कल्पना असावी, त्यामुळेच की काय या मार्गावरून जलद लोकल येत असल्याची सूचना वारंवार दिली जाते. पण, या सावधानतेच्या इशाऱ्याकडे दुर्लक्ष करून दिवा स्थानकात प्रवासी आपला जीव धोक्‍यात घालतच आहेत. 

रोज सकाळी तीन ते चार लोकल पकडण्यासाठी दिव्यातील प्रवासी रुळावर उतरून गाडीत चढण्याचे दिव्य करतात. त्यावेळी खूप भीती वाटते. ज्या बाजूला दिवा स्थानक, त्याच दिशेला ठाणे स्थानकाचा फलाट येतो. ठाण्याला उतरण्यासाठी काही जणी तर विठ्ठलवाडीपासून लोकलच्या दरवाजात उभ्या असतात. दिव्यातील महिला प्रवाशांना त्या लोकलमध्ये चढूच देत नाहीत. काही जणी तर हातावर पिनाही मारतात. या महिलांवर कारवाई व्हायला हवी. 
- श्रावणी भोसले, प्रवासी. 

प्रवाशांनी लोकल पकडण्यासाठी जीव धोक्‍यात घालणे चुकीचे आहे. रेल्वे पोलिसांनीही त्यांना अडवायला हवे; पण सकाळी गर्दीच्या वेळेस छत्रपती शिवाजी टर्मिनसला जाणाऱ्या लोकल प्रवाशांनी गच्च भरलेल्या असतात. शिवाय ठाण्याला उतरणारे प्रवासी आधीच दरवाजा अडवून उभे असतात. त्यामुळे दिव्यातील प्रवासी नाईलाजाने विरुद्ध दिशेने चढतात. 
दिवा-सीएसटीएम लोकल सुरू केल्यास त्यांना दिलासा मिळेल. 
- ऍड्‌. आदेश भगत, अध्यक्ष, दिवा रेल्वे प्रवाशी संघटना. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com