डोंबिवलीत वाहन चोरी करणारे त्रिकुट अटकेत, दोन बाईकसह ७ रिक्षा हस्तगत

पूजा विचारे
Tuesday, 20 October 2020

 डोंबिवलीत पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. पोलिसांच्या पथकानं तिघा सराईत वाहन चोरट्यांच्या मुसक्या आवळल्या आहेत. या चोरट्यांकडून पोलिसांनी ७ रिक्षा आणि २ बाईक जप्त केल्यात. तब्बल ७ लाख ३० हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे.

मुंबईः  डोंबिवलीत पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. पोलिसांच्या पथकानं तिघा सराईत वाहन चोरट्यांच्या मुसक्या आवळल्या आहेत. या चोरट्यांकडून पोलिसांनी ७ रिक्षा आणि २ बाईक जप्त केल्यात. तब्बल ७ लाख ३० हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे. हे तिन्ही आरोपी चोरलेली सर्व वाहनं विकणार होते, त्यांचा हा प्लान पोलिसांनी उधळून लावला. 

डोंबिवली विभागाचे सहाय्यक पोलिस आयुक्त पदावर आल्यापासून जय मोरे यांनी गुंड- गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्याचा सपाटाच लावला आहे. अटक करण्यात आलेल्या चोरट्यांचं वय २० ते २४ दरम्यान आहे. 

शंतनू सुमेध काळे (२२) आणि विशाल सोमाजी इंगोले (२४) हे दोन्ही चोरटे बदलापूर पाईपलाईन रोडला असलेल्या कोळेगावचे रहिवासी आहेत. किरण राजू भोसले (२०) हा रिक्षाचालक असून आशण कल्याण- कसारा रेल्वे मार्गावरील आंबिवली स्टेशन जवळच्या बनेलीगावमध्ये राहतो. या तिन्ही चोरट्यांना शनिवारी रात्री पावणेनऊच्या सुमारास बेड्या ठोकल्या आणि त्यानंतर रविवारी कल्याण कोर्टात हजर केले. कोर्टानं या तिघांना अधिक चौकशीकरिता दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. 

अधिक वाचाः  मराठी भाषेच्या आग्रहासाठी राज ठाकरेंचा जगात डंका! अ‍ॅमेझॉनच्या जेफ बेझॉसचे प्रतिनिधी मुंबईत

राजू मनोहर चौधरी (४२) हे चोळगावात राहतात. त्यांची रिक्षा चोरीला गेली होती. ८ ऑक्टोबरला त्यांनी रिक्षा चोरीची तक्रार रामनगर पोलिस ठाण्यात दाखल केली. यावेळी आरोपींचा शोध सुरु असतानाच पेट्रोलिंगदरम्यान फौजदार दिपक दाभाडे, फौजदार संदीप एगडे, उगाडे, शंकर निवळे, विशाल वाघ, सोमनाथ पिचड, वैजीनाथ रावखंडे, दिलीप कोती यांनी सुनिलनगरमधील राज कमल सोसायटीच्या मागे एका रिक्षामध्ये दोन जण संशयास्पदरित्या बसल्याचं दिसलं. 

त्यानंतर चौकशी केली असता त्यांच्याकडील रिक्षा चोळगावात राहणाऱ्या राजू चौधरी यांच्या मालकीची असल्याचं उघड झालं. शंतनू काळे आणि विशाल इंगोले या दोघांनी आणखी एक गौप्यस्फोट केला आणि त्यांच्या जबाबात त्यांचा साथीदार किरण भोसले याचे नाव समोर आले. त्यानंतर पोलिसांनी त्याच्याही मुसक्या आवळल्या. 

या तिन्ही चोरट्यांनी डोंबिवली व्यतिरिक्त नवी मुंबईतील तुर्फे, कोपरखैरणे, वाशी सेक्टर- ९, सानपाडा गाव, डायघर, मुंब्रा, मानपाडा भागातूनही वाहने चोरल्याची कबूली दिली. या तिघांनी विविध ठिकाणी लपवून ठेवलेल्या ७ रिक्षा आणि २ दुचाक्याही पोलिसांनी हस्तगत केल्याचं सहाय्यक पोलिस आयुक्त जय मोरे यांनी सांगितलं आहे.

Three thieves arrested stealing vehicles Dombivali rickshaws two bikes seized


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Three thieves arrested stealing vehicles Dombivali rickshaws two bikes seized