स्मार्ट व्हिलेज समस्यांच्या गर्तेत

सकाळ वृत्‍तसेवा
शनिवार, 24 ऑगस्ट 2019

रस्‍ते, पाणीपुरवठा, स्‍वच्छतेचा बाेजवारा; पालिकेचे दुर्लक्ष 

पनवेल : स्मार्ट व्हिलेज होईल तेव्हा होईल, मात्र ग्रामपंचायत काळात पुरवण्यात येणाऱ्या सोयी-सुविधा तरी उपलब्ध करून द्या, असे म्हणण्याची वेळ पालिकेत समाविष्ट करण्यात आलेल्या धानसर गावातील नागरिकांवर आली आहे. गावात पाणीपुरवठा करण्याकरीता ग्रामपंचायतीमार्फत बांधण्यात आलेली पाण्याची टाकी कोसळून दीड महिन्यापेक्षा जास्त कालावधी उलटल्यानंतरही दुरुस्तीचे काम तात्काळ सुरू न करता निविदेच्या फेऱ्यात हे काम अडकवण्यात आले आहे. याशिवाय रस्त्यांची दुरवस्था, अपुरा पाणीपुरवठा, शाळा परिसरात तुंबलेले पाणी आदी विविध समस्यांच्या गर्तेत धानसर हे स्मार्ट व्हिलेज अडकले आहे. 

पालिकेच्या प्रभाग क्रमांक एकमध्ये ठाणे आणि रायगड जिल्ह्याच्या वेशीवरील धानसर गावाचा समावेश करण्यात आला आहे. महामार्गापासून जवळपास दीड ते दोन किलोमीटर अंतरावर असलेले हे गाव प्रशासनाकडून कायमच दुर्लक्षित असल्याने पालिकेत समाविष्ट केल्यानंतर तरी गावाची अडचणीच्या फेऱ्यातून सुटका होईल, ही अपेक्षा सध्या तरी फोल ठरल्याचे पाहायला मिळत आहे. गावातील रस्त्यांची चाळण झाली असून, जिल्हा परिषदेच्या शाळेसमोर पावसामुळे साचलेल्या चिखलातून विद्यार्थ्यांना वाट काढावी लागत असल्याचे पाहायला मिळत आहे. 

टाकी पडल्यापासून ती पुन्हा उभारली जावी, याकरिता पाठपुरावा करत आहे. मात्र निविदा प्रक्रिया सुरू असल्याचे कारण सांगत अद्यापपर्यंत हे काम रखडले आहे.
- रमेश वावेकर, माजी सरपंच.

निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असून एका आठवड्यात कामाला सुरुवात करण्यात येणार आहे. याकरिता दोन ते अडीच लाखांची तरतूद करण्यात आली आहे. 
- शंकर कुऱ्हाडे, अधिकारी, पाणीपुरवठा विभाग.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: In the throes of smart village problems