esakal | 'त्या' घटनेनंतर मुकेश अंबानींच्या घराबाहेर चोख सुरक्षा बंदोबस्त, जाणून घ्या संपूर्ण घटनाक्रम

बोलून बातमी शोधा

'त्या' घटनेनंतर मुकेश अंबानींच्या घराबाहेर चोख सुरक्षा बंदोबस्त, जाणून घ्या संपूर्ण घटनाक्रम}

गुरुवारी रात्री स्फोटकांनी आढळलेली कार ही विक्रोळी येथून चोरी झाल्याची माहिती समोर आली आहे. याप्रकरणी राष्ट्रीय तपास पथक(एनआयए) ही समांतर तपास करत आहेत.

'त्या' घटनेनंतर मुकेश अंबानींच्या घराबाहेर चोख सुरक्षा बंदोबस्त, जाणून घ्या संपूर्ण घटनाक्रम
sakal_logo
By
अनिश पाटील

मुंबईः प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांचे अँटिलिया निवासस्थानजवळ सापडलेल्या स्कॉर्पिओमधून जप्त करण्यात आलेल्या 20 जिलेटीन कांड्यांमध्ये अडीच किलो जिलेटीन असून ते छोटा स्फोट घडवण्यासाठी सक्षम आहे. पण ते कुढल्याही स्फोटक डीव्हीईला जोडण्यात न आल्यामुळे धोकादायक नव्हते. गुन्हे शाखा सीसीटीव्हीच्या मदतीने तपास करत आहे. गुरुवारी रात्री स्फोटकांनी आढळलेली कार ही विक्रोळी येथून चोरी झाल्याची माहिती समोर आली आहे. याप्रकरणी राष्ट्रीय तपास पथक(एनआयए) ही समांतर तपास करत आहेत.

तपासाकरिता पोलिसांनी 10 पथके सज्ज केली असून प्रत्येक पथकाकडे वेगळी जबाबदारी देण्यात आल्याची माहिती वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने  दिली. पोलिसांनी जप्त केलेली गाडी ही 17 फेब्रुवारी 2021ला विक्रोळी येथून चोरी झाली होती, अशी माहिती आहे. गाडीचे मालक ठाण्यामध्ये राहतात. लॉकडाऊनमध्ये कार बंद असल्यामुळे विकण्यासाठी त्यांनी कार सुरू केली होती. पण ती कार घटनास्थळी बंद पडली. त्यामुळे ते कार सोडून तेथून गेले होते. त्यानंतर ती चोरीला गेली. त्यावेळी त्यांनी तशी तक्रारही दिली होती. तेव्हा पासून गाडी वेगवेगळ्या जागी फिरत होती. यामुळे हा कट एक महिन्यापासून रचला असावा असा पोलिसांना संशय आहे. गाडीतील सर्व वस्तूंचे नमुने न्यायवैधक प्रयोगशाळेकडे तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. पोलिसांनी घटनास्थळ तसेच सर्व सीसीटीव्ही फुटेज तपासले असता या गाडीचा माग काढण्यास पोलिसांना यश आले आहे. अंबानी यांच्या घराजवळ एक गाडी सापडली असली तरी या गाडीमागे आणखी एक इनोव्हा गाडी असल्याचे तपासात समोर आले आहे.

मुंबई विभागातल्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

याप्रकरणी केलेल्या तपासात बुधवारी रात्री ही गाडी मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर पार्क केल्याचे समोर आले आहे. आता या गाडीबाबत मोठी माहिती पुढे आली आहे. ही गाडी चोरीची असल्याची माहिती समोर आली आहे. तसेच मुंबई पोलिसांच्या हाती काही महत्त्वाची माहिती लागली आहे. जी गाडी अंबानी यांच्या बंगल्याच्या बाजूला पार्क करण्यात आली होती. गाडीत बसलेली व्यक्ती ही ड्रायव्हरच्या बाजूने न उतरता गाडीच्या आतूनच मागच्या सीटवर गेली आणि तिथून फुटपाथच्या बाजूला उतरल्याने सीसीटीव्हीत सदर व्यक्ती दिसू शकली नाही. गाडी पार्क केल्यापासून सकाळपर्यंतचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी हस्तगत केले असून त्याची पडताळणी केली जात आहे. गाडीतील व्यक्ती ही मागच्या सीटवरून सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या विरुद्ध बाजूला असणाऱ्या फुटपाथवर उतरली आणि झुकत झुकत पुढे निघून गेल्याने पोलिसांच्या तपासात अडचणी निर्माण होत आहे.

चेहऱ्यावर मास्क आणि टोपी असल्याने सदर व्यक्तीची ओळख सापडत नसल्याची मुंबई पोलिसांची माहिती आहे. गाडी पार्क करणाऱ्यांचे काही फुटेज पोलिसांच्या हाती लागले आहेत. संबंधित व्यक्तीची ओळख पटवण्याचा पोलिसांचा प्रयत्न आहे. तोंडाला मास्क आणि टोपी असल्याने संबंधित व्यक्तीची ओळख पटविण्यात पोलिसांना अडचणी येत आहेत. तसेच गाडी मालकाची ओळख पटली असून त्यांचा जबाब नोंदवण्यात येणार आहे.  दरम्यान, याप्रकरणी गावदेवी पोलिस ठाण्यात भादंवि कलम 286, 465, 473, 506(2)120(ब) तसेच स्फोटक पदार्थ कायदा 1908 कलम 4 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून याचा तपास गुन्हे शाखा करीत आहे.  

स्कॉर्पिओ कारमध्ये मुंबई इंडियन लिहिलेल्या बॅगेत पोलिसांना एक पत्र मिळाले आहे, त्यातील मजकूर पुढीलप्रमाणे.

नीता भाबी और मुकेश भैया और फॅमिली, एक झलक है ये. अगली बार ये सामान पुरा हो के आयेगा.ओरिजनल गाडी मे आएगा.  तुम पुरा फॅमिली को उडाने का इंतजाम हो गया है! संभल जाना. गुड नाईट.

याशिवाय गाडीतून जप्त केलेल्या साहित्यामध्ये सुपर पावर डेझर एक्सप्लोजिव 255 एम एम * 125 ग्रॅम सोलर इंडस्ट्रीज लिमिटेडच्या डो बाजारगाव नागपूर असे लिहिलेल्या 19कांड्या,  4 बनावट नंबर प्लेट सापडले.

MH 04 DN 9945
गाडीचा नंबर ठाणे आरटीओ रजिस्ट्रेशनचा आहे. पण या नंबरवरुन तपासणी केली असता गाडीचे पुर्व मुंबई आरटीओ मधून रजिस्ट्रेशन केले, ती एका दुतावासाची असल्याचे बोलले जात आहे. 12 वर्षे जुनी असून रजिस्ट्रेशन मध्ये गाडी पांढऱ्या रंगाची ह्युंदाई वेरना गाडी असल्याचे सांगण्यात आले आहे. गाडीचे रजिस्ट्रेशन लकी डी या मुलूंडमधील व्यक्तीच्या नावाने करण्यात आले आहे.

MH 01 BU 6510
हा गाडीचा नंबर मध्य मुंबई आरटीओमध्ये रजिस्टर असल्याचे नमूद करण्यात आले असून गाडी मालक एक अति महत्वाच्या व्यक्तीच्या कंपनीच्या नावे असल्याचे नमूद असून गाडी सहा वर्षे जुनी आहे आणि हिरव्या रंगाची स्कॉर्पिओ गाडी नसून पांढऱ्या रंगाची स्कॉर्पिओ असल्याचे आरटीओ रजिस्ट्रेशनमध्ये नमूद केले आहे. 

MH 01 CZ 7239
या गाडीचा नंबर मध्य मुंबई आरटीओ मध्ये रजिस्टर असल्याचे नमूद करण्यात आले असून गाडी मालकाचे नाव रजिस्टरमध्ये निशांत सुर्वे असे नमूद करण्याच आले आहे आणि गाडी ही हिरव्या रंगाची स्कॉर्पिओ गाडी नसून पांढ-या रंगाची जॅग्वार रेंज रोवर असल्याचे रजिस्टर मध्ये नमूद आहे.

MH 01 DK 9945
या गाडीचा नंबरदेखील मध्य मुंबई आरटीओ मध्ये रजिस्टर असल्याचे नमूद करण्यात आले असून गाडी मालक एक अति महत्वाच्या व्यक्तीच्या कंपणीच्या नावे असल्याचे नमूद असून गाडी 1 वर्षे जुनी आहे आणि हिरव्या रंगाची स्कॉर्पिओ गाडी नसून पांढ-या रंगाची रेंज रोवर गाडी आहे असं आरटीओ नोंदमीमध्ये नमूद आहे.

हेही वाचा- Super Exclusive: 'या' आरोपाखाली चित्रा वाघ यांच्या पतीविरोधात गुन्हा दाखल

आदित्य ठाकरेंनी घेतली पोलिस आयुक्तांची भेट

पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी मुंबईचे पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांची भेट घेतली आहे. मुंबईतल्या सुरक्षा व्यवस्थेवर त्यांनी चर्चा केली. तब्बल अर्धा तासांपेक्षा अधिक वेळ त्यांनी पोलिस आयुक्तांबरोबर चर्चा केली. अंबानी यांच्या बंगल्याबाहेर स्फोटकांनी भरलेल्या कार सापडल्यानंतर मुंबई सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला होता.

अँटिलियाबाहेर क्यूआरटी पथकाचे जवान तैनात
अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकांनी भरलेली गाडी सापडल्यानंतर मुंबईतील सुरक्षा यंत्रणांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. या घटनेची गांभीर्याने दखल घेण्यात आली असून मुकेश अंबानी यांच्या सुरक्षेसाठी अँटिलिया निवासस्थानाबाहेर शीघ्र कृती दलाचे(क्यूआरटी) जवान तैनात करण्यात आले आहेत.

या ठिकाणच्या CCTV मध्ये दिसून आल्या गाड्या

अंबानी यांच्या घराबाहेर जी संशयास्पद स्फोटक भरून आढळलेल्या संशयास्पद कारचा पोलिसांनी CCTV च्या माध्यमातून माग काढला आहे.

घटनाक्रम

  • सर्व प्रथम इनोव्हा कार ठाण्यातून रात्री 1.20 च्या सुमासास मुलुंड टोल नाक्यावरून मुंबईत दाखल झाली.
  • जिलेटीन ठेवलेली स्कॉर्पिओ कार 1.40 च्या दरम्यान प्रियदर्शनी येथे इनोव्हा कार एकत्र दिसत आहेत.
  • त्यानंतर या दोन्ही कार दादरच्या शिंदेवाडी सिग्नल  येथील सीसीटीव्हीमध्ये दरम्यान दिसून आले आहेत.
  • वरळी जंक्शन येथे या दोन्ही गाड्या एकामागोमाग  सुमारास पाहिल्या गेल्या आहेत.
  • त्यानंतर या दोन्ही कार हाजीअलीला गेल्या स्पॉटेड झालेले आहेत.
  • पुढे दोन्ही गाड्या अकराच्या सुमारास भायखळा खडा पारशी येथील सीसीटीव्हीत दिसून आल्या आहेत.
  • 25  फेब्रुवारीच्या रात्री 2.18 वा.  दोन्ही गाड्या अंबानी यांच्या बंगल्याजवळ आढळून आल्या आहे.
  • यातील स्फोटकांची गाडी उभी केल्यानंतर दुसरी संशयित इनोव्हा कार ही ठाणे टोल नाका येथील 3.40 वा च्या सुमारास सीसीटीव्हीमध्ये दिसून येत आहे.

 
स्कॉर्पिओ कारची नंबरप्लेट निता अंबानींच्या ताफ्यातील

जिलेटीन असलेली स्कॉर्पिओ कारमध्ये सापडलेली बनावट नंबर प्लेट नीता अंबानी यांच्या ताफ्यातील आघाडीची कार आहे. याशिवाय या स्कॉर्पिओ कारचा क्रमांकही बनावट असल्याचे निष्पन्न झाले आहे.

-------------------------------------

(संपादन- पूजा विचारे)

Tight security outside Mukesh Ambani house find out the whole incident