तिरुपती मंदिर खुले, मग राज्यातील प्रार्थनास्थळे का नाही? उच्च न्यायालयात याचिक दाखल

सुनिता महामुणकर
Tuesday, 18 August 2020

राज्यातील प्रार्थनास्थळे खुली करण्याबाबत राज्य सरकारने भूमिका स्पष्ट करावी, असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने आज दिले.

मुंबई : राज्यातील प्रार्थनास्थळे खुली करण्याबाबत राज्य सरकारने भूमिका स्पष्ट करावी, असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने आज दिले.  कोरोना संसर्ग असल्यामुळे तूर्तास तरी  प्रार्थना स्थळे सुरू करता येणार नाही, असे राज्य सरकारने यापूर्वी स्पष्ट केले आहे. मात्र आता पुन्हा सामाजिक संस्थेच्या वतीने एड दिपेश सिरोया यांनी न्यायालयात जनहित याचिका केली आहे. आंध्रप्रदेश मधील तिरुपती मंदिरचा दाखला याचिकादारांनी दिला आहे. तिरुपती मंदिर खूप भव्य आहे, आणि महाराष्ट्रातील मंदिरांंपेक्षा प्रशस्त आहे. सर्वाधिक भाविक या मंदिरात असतात. पण तरीही कोविड 19 मध्ये तिथे नागरिकांसाठी मंदिर खुले करण्यात आले आहे. मग राज्य सरकार सुरक्षा निर्देश आणि शर्ती सह प्रार्थनास्थळे का सुरु करीत नाही, असा मुद्दा याचिकेत उपस्थित केला आहे.

बेस्टची कर्मचाऱ्यांवर मोठी कारवाई, 'इतक्या' कर्मचाऱ्यांना केलं बडतर्फ

राज्य सरकारच्या वतीने महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी यांनी या युक्तिवादाचे खंडन केले. अन्य एका याचिकेत सरकारने प्रार्थना स्थळे खुली करण्यावर सविस्तर भूमिका स्पष्ट केली आहे, असे ते म्हणाले. कोरोना साथीमुळे परिस्थिती सर्वसामान्य नाही. त्यामुळे प्रार्थना स्थळे सुरू केल्यास संसर्ग वाढून नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो, असे सरकार कडून सांगण्यात आले आहे. मात्र संबंधित याचिका जैन मंदिरांंसाठी होती. त्यामुळे या याचिकेवर राज्य सरकारने खुलासा करावा, असे निर्देश मुख्य न्या दिपांकर दत्ता आणि न्या रेवती मोहिते-डेरे यांच्या खंडपीठाने दिले.

ठाणे मनपा आयुक्तांना अल्टिमेटम, पुढील चार दिवसात खड्डे बुजवा नाहीतर...

राज्य सरकारच्या वतीने यापूर्वी सर्व धर्मियांच्या प्रार्थनास्थळे सध्याच्या परिस्थितीत सुरू करायला नकार देण्यात आला आहे. तर जैन मंदिरे चालू पर्युषण कालावधीमध्ये खुली करावी या मागणीसाठी जैन संस्थांंनी सर्वोच्च न्यायालयात याचिका केली आहे. राज्यातील परिस्थिती अद्यापही सुधारलेली नसून नागरिकांनी घरी राहूनच प्रार्थना करावी, असा सल्ला न्यायालयाने याआधीच्या सुनावणीमध्ये दिला होता.

-------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Tirupati temple open, then why there are no places of worship in the state? Petition filed in the High Court