"दिवस आनंदाचा, मात्र महाराष्ट्राला अपेक्षेप्रमाणे कोरोनाचे डोस मिळाले नाहीत" : राजेश टोपे

सुमित बागुल
Wednesday, 13 January 2021

आपण आठ लाख लोकांची नावे लसीकरणासाठी अपलोड केली आहेत. त्या तुलनेत कमी डोस आलेले आहेत

मुंबई : कोरोनाचा सर्वाधिक कहर पाहिलेल्या मुंबईत अखेर कोरोना लसींचे डोस पहाटे साडे पाच वाजता दाखल झाले आहेत. महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये देखील आज कोरोनाची लस पोहोचतेय. अशात महाराष्ट्राच्या वाट्याला कमी डोस आल्याचं महाराष्ट्राचे सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी माध्यमांना दिलेल्या प्रतिक्रियेत म्हटलंय.

अखेर महाराष्ट्रात लस दाखल झाल्याने मला प्रचंड आनंद होत आहे. आपण आठ लाख लोकांची नावे लसीकरणासाठी अपलोड केली आहेत. त्या तुलनेत कमी डोस आलेले आहेत. महाराष्ट्रात दाखल झालेली लस राज्यभरातील डेप्युटी डायरेक्टर ऑफिसेसमध्ये पोहोचेल. महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये आज रात्री आणि काही जिल्ह्यांमध्ये उद्या सकाळपर्यंत लस पोहोचणार आहे. डेप्युटी डायरेक्टर ऑफिसेसमधून ही लस सर्व जिल्ह्यांमध्ये पोहोचवली जाणार आहे. सर्व केंद्रांवर लस साठवणूक करण्यासाठीची योग्य उपकरणे आहेत अशीही माहिती राजेश टोपे यांनी दिली. 

महत्त्वाची बातमी : माघी गणेशोत्सवात पीओपीचा वापर करता येणार  मूर्तिकार आणि कारागिरांना केंद्राचा दिलासा 

१६ तारखेला पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सकाळी ऑनलाइनच्या माध्यमातून लसीकरण मोहिमेचं उदघाटन करणार आहेत. महाराष्ट्रातून मुंबईतील कूपर हॉस्पिटल आणि जालन्यातील जिल्हा रुग्णालय या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. याआधी राज्याकडून ५११ लसीकरण केंद्रांचे प्लॅनिंग करण्यात आले होते. दरम्यान काल झालेल्या व्हिडीओ कॉन्फरन्सिंगमध्ये असं ठरलं की हॉस्पिटलमधील इतर कामकाज देखील सुरु राहावं म्हणून इतक्या मोठ्या प्रमाणात लसीकरण कार्यक्रम राबवू नये. केंद्राकडून आम्हाला असं सांगण्यात आलं. म्हणून ५११ चा आकडा आता ३५० वर आलेला आहे. 

महाराष्ट्रात ३५० लसीकरण केंद्रे आहेत. प्रत्येक सेंटरवर पहिल्या दिवशी ३५० आरोग्य कर्मचाऱ्यांना लस दिली जाणार आहे. त्यामुळे पहिल्या दिवशी ३५ हजार आरोग्य कर्मचाऱ्यांना लस देण्याचं टार्गेट राज्याने डोळ्यासमोर ठेवलं आहे. आम्हाला ९ लाख ६३ हजार डोस देण्यात आलेले आहेत. आपण अपलोड केलेल्या माहितीत ८ लाख नावे आहेत. वेस्टेज पकडता आपल्याला १७ ते साडे १७ लाख डोस मिळायला पाहिजे होते. त्यापैकी केवळ ९ ते साडे ९ लाख डोस राज्याच्या वाट्याला आलेले आहेत.  त्यामुळे आम्ही अपलोड केलेल्या एकूण संख्येपैकी ५५ टक्के लसीकरण करण्याचा निर्धार आम्ही केला आहे. हे ड्रग अत्यंत सुरक्षित आहे, त्यामुळे सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांनी हे घ्यायलाच पाहिजे असं आवाहन राजेश टोपे यांनी केलं आहे.  

मुंबईतील सर्व महत्त्वाच्या वाचण्यासाठी इथे क्लिक करा । Read all latest marathi news from mumbai

Today is a happy day but Maharashtra did not get the dose of corona as expected Rajesh Tope


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Today is a happy day but Maharashtra did not get the dose of corona as expected Rajesh Tope