लोकनिधीतून उभारलेली चैत्यभूमी, जतन करण्याची लोकभावना

तेजस वाघमारे
Sunday, 6 December 2020

14 एप्रिल 1967 मध्ये मुंबईत भीमज्योत आणली. राजगृहावर भीमज्योतचे स्वागत करण्यात आले. यानंतर ती चैत्यभूमीवर ठेवण्यात आली.

मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे 6 डिसेंबर 1956 रोजी महापरिनिर्वाण झाले. त्यांच्यावर अंत्यसंस्कार कुठे करायचे याबाबत चर्चा झाल्यानंतर अखेर बाबासाहेबांच्या कर्मभूमी असलेल्या मुंबईत अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय झाला. त्याप्रमाणे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार झाले. त्यांचे अंत्यविधी झालेल्या ठिकाणी त्यांचे स्मारक उभारावे अशी मागणी त्यावेळी झाली. बाबासाहेबांचे पुत्र भैयासाहेब आंबेडकर यांनी यासाठी पुढाकार घेत आंबेडकर स्मारक समिती स्थापन केली. चैत्यभूमीसाठी निधी जमा करण्यासाठी आंबेडकरांचे जन्मगाव असलेल्या महू गावापासून भीमज्योत काढण्याचा निर्णय झाला. त्यानुसार ही भीमज्योत तीन ते चार राज्यांमध्ये फिरविण्यात आली. यावेळी मोलमजुरी करणारे, खडी फोडणारे, कामगार यांनी शक्‍य ती मदत केली. 

14 एप्रिल 1967 मध्ये मुंबईत भीमज्योत आणली. राजगृहावर भीमज्योतचे स्वागत करण्यात आले. यानंतर ती चैत्यभूमीवर ठेवण्यात आली. तात्कालीन मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या उपस्थितीत ज्योतीची स्थापना झाली. त्यावेळचे नामचित आर्किटेक्‍ट यांच्या मदतीने चैत्यभूमीचा आराखडा तयार करण्यात आला. लोकनिधी जमा करण्यासाठी स्टेट बॅंक ऑफ इंडियामध्ये एक बॅंक खाते उघडण्यात आले. जसजसे पैसे जमा होत होते, त्यानुसार ती रक्कम बॅंकेत जमा करण्यात येत असे.

चैत्यभूमीच्या उभारणीस सुरूवात झाल्यानंतर पैसे कमी पडू नयेत, यासाठी राज्यभरातून लोक पैसे देत होते. लोकवर्गणीतून चैत्यभूमी 14 एप्रिल 1967 साली पूर्ण झाली.

अधिक वाचा- अखेर अकरावी प्रवेशाची दुसरी गुणवत्ता यादी जाहीर; पहिल्या यादीच्या तुलनेत दुसऱ्या यादीत किंचित घसरण

चैत्यभूमीच्या स्तुपात बाबासाहेबांच्या अस्ती ठेवण्यात आल्या आहेत. त्यामुळे या वास्तूसमोर अनुयायी नतमस्तक होतात. इंदू मिल येथे आंबेडकरांचे आंतरराष्ट्रीय स्मारक उभारण्यात येत असल्याने या वास्तूचे काय होणार असा प्रश्‍न अनुयायांपुढे आहे. या वास्तूमध्ये बाबासाहेबांच्या अस्ती ठेवल्याने ही वास्तूही राष्ट्रीय स्मारक म्हणून जतन करावी, अशी मागणी नेत्यांकडून होत आहे. ही वास्तू देशभरातील आंबेडकरी अनुयायांच्या अस्थेचा विषय असल्याने तिचे जतन करावे, अशी मागणी ज्येष्ठ लेखक विचारवंत ज.वि.पवार यांनी केली आहे.

तोडगा काढण्याचा प्रयत्न

चैत्यभूमीमध्ये ठेवण्यात आलेल्या दानपेटीत अनुयायी शक्‍य ते पैसे दान करत असतात. मात्र वारसा हक्काचा वाद न्यायालयात पोहोचल्याने येथील दानपेटी कोर्ट रिसिव्हरच्या ताब्यात आहे. या दानपेटीत आजपर्यंत कोट्यावधी रूपये जमा झाले असून त्याचा उपयोग वैद्यकीय महाविद्यालय, आरोग्यासाठी वापरावा असे, ज.वि.पवार यांचे मत आहे. याप्रकरणी तोडगा काढण्यासाठी पवार यांनी पुढाकार घेतला असल्याचेही त्यांनी सांगितले.

मुंबई विभागातल्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

ते डेड खाते सुरू करण्याचा प्रयत्न

चैत्यभूमी उभारण्यासाठी लोकवर्गणी जमा करण्यात येत होती. हा निधी स्टेट बॅंक ऑफ इंडियातील खात्यामध्ये जमा करण्यात येत होता. हे अकाउंट तीन व्यक्तींच्या नावे खुले करण्यात आले होते. मात्र, यातील दोन व्यक्तींचा मृत्यू झाला असून आता एका व्यक्तीने आणखी एका व्यक्तीची नियुक्ती केल्यास हे खाते पुन्हा जिवंत होऊ शकते. या खात्यात त्यावेळी 60 हजार रूपये जमा होते. हे खाते पुन्हा जिवीत करण्यासाठी मी प्रयत्न करत असल्याचेही पवार म्हणाले.

----------------------------------------

(संपादन- पूजा विचारे)

Today Mahaparinirvana Day December 6 Chaitya Bhoomi Bhimrao Ramji Ambedkar 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Today Mahaparinirvana Day December 6 Chaitya Bhoomi Bhimrao Ramji Ambedkar