आज महापरिनिर्वाण दिन, पहिल्यांदाच चुकली चैत्यभूमीची वारी

आज महापरिनिर्वाण दिन, पहिल्यांदाच चुकली चैत्यभूमीची वारी

मुंबईः आज भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा 64 वा महापरिनिर्वाण दिन. मात्र महापरिनिर्वाण दिनावरही यंदा कोरोनाचे सावट पाहायला मिळत आहे. चैत्यभूमी परिसरात अनुयायांनी गर्दी करू नये यासाठी पोलिसांनी शिवाजी पार्क, चैत्यभूमी परिसरात चोख बंदोबस्त ठेवला आहे. यामुळे यंदा डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात चैत्यभूमी परिसर अनुयायांशिवाय सुनासूना दिसत आहे. त्यामुळे आज काही अनुयायांची पहिल्यांदा वारी चुकली आहे.

कोल्हापूर जिल्हातील भुदरगड तालुक्यात राहणारे शाहिर सागर कांबळे हे दिव्यांग आहेत. आई वडील नाही, पत्नी मुकबधीर आहे.  सागर कांबळेना चालण्यासाठी त्यांना व्हिलचेअरचा आधार घ्यावा लागतो. मात्र गेल्या 25 वर्षापासून ते न चुकता सहा डिंसेबरला चैत्यभूमीला बाबासाहेबांना आदरांजली अर्पण करण्यासाठी मुंबईला येतात. शाहिर कांबळे यांच्यासाठी चैत्यभूमी हे उर्जास्थळ आहे. बाबासाहेबांना वंदन करुन त्यांचे विचार घेऊन जातो. शाहिरीच्या माध्यमातून गावोगावी बाबासाहेबांचे विचार पोहोचवतात. यंदा कोविडमुळे चैत्यभूमीला जाऊ शकत नाही याची खंत त्यांना बोचत आहे. मात्र जोपर्यंत अंगात रक्ताचा थेंब आहे, तोपर्यंत बाबासाहेबांचे विचार पुढ नेण्याचे काम करत राहील असा पण त्यांनी व्यक्त केला.
शाहीर सागर कांबळे, कोल्हापूर
 

मुंबईच्या परळ भागात राहणाऱ्या 32 वर्षाच्या स्नेहल जाधव या लहानपणीपासून आई वडीलांसोबत चैत्यभूमीला जातात. 6 डिसेंबरला चैत्यभूमीला जाऊन बाबासाहेबांना मानवंदना देण्यात त्या आजपर्यंत चुकल्या नाही. मात्र चैत्यभूमीपासून जवळ राहूनही यंदा तिथे जाऊन बाबासाहेबांना वंदन करु शकणार नाही या भावनेने स्नेहल दुखी आहेत. गेल्या चार वर्षापासून स्नेहल, फेसबुक आंबेडकरी संघटनेच्या माध्यमातून गरीब विद्यार्थ्यासाठी 'वही पेन' मोहीम चालवतात. या माध्यमातून जमलेल्या वह्या, पेन आदिवासी विद्यार्थ्यांमध्ये वाटतात. मात्र या वर्षीदेखील मुलं वाट पाहत असतील मात्र आम्ही तिथे जाऊ शकणार नाही याची खंत त्यांनी व्यक्त केली आहे. मात्र कोविड ओसरल्यावर बाबासाहेबांचे काम पुन्हा ताकदीने नेण्याचा संकल्प त्यांनी व्यक्त केला.
स्नेहल कांबळे, परळ
 
प्रत्येकाची एक श्रद्धा असते

मी गेली पंधरा वर्ष चैत्यभूमीवर बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी जातो. अभिवादन झाल्यानंतर आम्ही अनुयायांची सेवाही करतो. कोरोनाची परिस्थिती निर्माण झाली असली तरी सरकारने नियमांचे पालन करून अभिवादन करण्याची परवानगी द्यायला हवी होती. प्रत्येकाची एक श्रद्धा असते. राज्यात निवडणूका इतर कार्यक्रम होतात. मात्र, अभिवादन करण्यासाठी अप्रत्यक्षरित्या बंदी घालणे योग्य नाही. बाबासाहेबांचे अनुयायी विज्ञानवादी आहेत. ते नियमांचे पालन करणारच. बाबासाहेबांच्या विचारांचा प्रचार प्रसार करणे हे आमचे ध्येय आहे, त्यानुसार चैत्यभूमीवर अनुयायी आल्यास त्यांना कोरोनाबाबत माहिती देण्यासाठी आम्ही नक्की जावू.
सुनील जाधव, काळाचौकी
 

मी गेली वीस वर्षे चैत्यभूमीवर जाऊन बाबासाहेबांना अभिवादन करत आहे. यंदा कोरोनामुळे मला  चैत्यभूमीवर जाता येत नाही, याची हुरहूर कायम राहील. मात्र बाबासाहेबांचे विचार सर्व समाजातील तरुणांपर्यंत पोचविण्याचा माझा संकल्प पूर्ण करण्यासाठी माझे काम सोशल मीडियाच्या माध्यमातून सुरूच राहणार आहे.
जितेंद्र तांबे, शिवडी

-----------------------------------

(संपादन- पूजा विचारे)

Today Mahaparinirvana Day December 6 Chaitya Bhoomi subdued events due Covid 19

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com