राज्यपालांच्या हस्ते कला प्रदर्शनाचे उद्‍घाटन

राज्यपालांच्या हस्ते कला प्रदर्शनाचे उद्‍घाटन

मुंबई, ता. २: ‘बॉम्बे आर्ट सोसायटी’च्या १३० व्या अखिल भारतीय वार्षिक कला प्रदर्शनाची दिमाखात सुरुवात झाली. प्रदर्शनाचे उद्‍घाटन राज्यपाल भगतसिंग कोश्यारी आणि जेएसडब्ल्यू फाऊंडेशनच्या संगीता जिंदल यांच्या हस्ते मंगळवारी (ता. १) सायंकाळी ५ वाजता जहांगीर कलादालन येथे करण्यात आले.
या वेळी ४८ कलाकारांचा सन्मान करण्यात आला. ७ मार्चपर्यंत कलारसिकांना हे प्रदर्शन पाहता येईल. त्यानंतर १० ते २० मार्चदरम्यान प्रदर्शनातील निवडक कलाकृती ‘बॉम्बे आर्ट सोसायटी’च्या वांद्रे येथील कलासंकुलात प्रदर्शित केल्या जातील. ‘या प्रदर्शनामधील सर्व विजेत्यांचे मी अभिनंदन करतो. तरुण पिढीची प्रतिभा आणि विशेषत: देशाच्या दुर्गम भागातील कलाकारांना त्यांचे कौशल्य सादर करण्यासाठी व्यासपीठ म्हणून अशा प्रकारच्या कलाप्रदर्शनांची आवश्यकता आहे. आपल्या देशातील कला जिवंत ठेवण्याचे प्रशंसनीय कार्य बॉम्बे आर्ट सोसायटी करत आहे,’ अशा शब्दांत आपला आनंद राज्यपाल कोश्यारी यांनी व्यक्त केला. या वेळी राज्यपालांतर्फे बॉम्बे आर्ट सोसायटीला आर्थिक साह्य दोन लाख रुपयांची देणगी देण्यात आली.
...
२५०० प्रवेशिका...
या प्रदर्शनात देशभरातून चित्रकृती, शिल्पकृती, छायाचित्रे अशा विविध कलाप्रकारांमधील २५०० प्रवेशिका आल्या. दृष्यकला क्षेत्रातील तज्ज्ञ, कलासमीक्षक, कला इतिहासकार अशा मान्यवरांचा समावेश असलेल्या निवड समितीद्वारे त्या कलाकृतींमधून २४० कलाकृती या वर्षी निवडल्या गेल्या. २४० कलाकृतींमधून जवळपास सहा लाखांपेक्षा जास्त रकमेची एकूण ४८ विविध पारितोषिके, शिष्यवृत्ती आणि कलाक्षेत्रातील महत्त्वाचे समजले जाणारे पुरस्कार देण्यात आले.
...
देशातील कालाप्रवाहांचे प्रतिबिंब...
जेएसडब्ल्यू फाऊंडेशनच्या अध्यक्ष संगीता जिंदल म्हणाल्या, की आपल्या देशात कलात्मक ज्ञान भरपूर आहे. तसेच देशभरातील छोट्या शहरांमधून अनेक कलाकार येत असल्याचे पाहून आनंद वाटतो. बॉम्बे आर्ट सोसायटीचे अध्यक्ष राजेंद्र पाटील म्हणाले, की या वर्षी सोसायटीच्या वार्षिक प्रदर्शनासाठी दिल्ली ते केरळ आणि राजस्थान ते आसाम अशा देशभरातून जवळपास प्रत्येक राज्यातून एकूण २५०० प्रवेशिका मिळाल्या असून हे प्रदर्शन खरोखर आपल्या देशातील कलेचे, कालाप्रवाहांचे प्रतिबिंब ठरत आहे.
...

नामवंत चित्रकार व कलालेखक रवी परांजपे यांना या वर्षीचा रूपधर जीवनगौरव पुरस्कार देण्यात आला. सागर कांबळे यांना गव्हर्नर अवॉर्ड, विकास मल्हारा यांना बॉम्बे आर्ट सोसायटीचे गोल्ड मेडल देण्यात आले. सांगलीचे मंगेश पाटील यांना ‘बेंद्रे-हुसेन शिष्यवृत्ती, लक्ष्मण चव्हाण यांना लालीभाई धरमदास भम्भानी शिष्यवृत्ती; तर गोव्याचे स्वप्नेश वाइंगणकर यांना संध्या मिश्रा शिष्यवृत्ती देण्यात आली.
...

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com