मेट्रोच्या उद्‍घाटनावरून राजकारण रंगणार

मेट्रोच्या उद्‍घाटनावरून राजकारण रंगणार

मुंबई, ता. १ : मेट्रो ७ आणि मेट्रो २ अ या दोन्ही मार्गांच्या पहिल्या टप्प्याचे उद्‍घाटन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते उद्या (ता. २) सायंकाळी होणार आहे; मात्र या कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिकेवर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा उल्लेख टाळण्यात आला. त्यामुळे मेट्रोचा श्रेयवाद चांगलाच रंगणार आहे.

भाजप-शिवसेना युती सरकारच्या काळात मेट्रो ७ आणि मेट्रो २ अ सह विविध मेट्रो प्रकल्पांची कामे हाती घेण्यात आली होती. २०१९ पर्यंत हा प्रकल्प पूर्ण करण्याचे उद्दिष्ट होते; परंतु विविध कारणांमुळे प्रकल्प रखडला होता. अखेर या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यातील काम पूर्ण झाले असून गुढीपाडव्यापासून हा मार्ग प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार आहे. या मेट्रो प्रकल्पाचा उद्‍घाटन कार्यक्रम शनिवारी (ता. २) आरे रोड येथील सेंट पायस महाविद्यालय येथे आयोजित करण्यात आला आहे.

दरम्यान, या कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिकेवर सत्ताधारी नेत्यांसह विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर आणि भाजपच्या काही आमदारांचा उल्लेख करण्यात आला आहे; मात्र माजी मुख्यमंत्री तथा विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या नावाचा उल्लेख करण्यात आलेला नाही. दुसरीकडे या मेट्रोचे श्रेय घेण्यासाठी भाजपने शहरात विविध ठिकाणी बॅनरबाजी केली आहे. त्यातच आता निमंत्रण पत्रिकेवर फडणवीस यांचे नाव नसल्याने सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगलाच वाद रंगण्याची शक्यता आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com