तब्बल २३ तासांनी डाऊन रेल्वे मार्ग खुला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

तब्बल २३ तासांनी डाऊन रेल्वे मार्ग खुला
खोपोलीत अनधिकृत टपऱ्या व हातगाडी विरोधात मोहीम

तब्बल २३ तासांनी डाऊन रेल्वे मार्ग खुला

sakal_logo
By

मुंबई, ता. ४ : दरभंगा पवन एक्स्प्रेसच्या अपघातग्रस्त ठिकाणी रुळांचे काम पूर्ण करण्यात मध्य रेल्वे प्रशासनाला यश आले आहे. रेल्वे रूळ, स्लीपरची दुरुस्ती आणि देखभाल करण्यात आल्यानंतर तब्बल २३ तासांनी आज दुपारी एलटीटी-गोरखपूर डाऊन मार्गावरून पहिली गाडी चालविण्यात आली. अपघातामुळे एकूण १४ गाड्या रद्द करण्यात आल्या. २१ एक्स्प्रेसचे मार्ग बदलण्यात आले. ११ गाड्या शाॅर्ट टर्मिनेट करण्यात आल्या. दुर्घटनेचा प्राथमिक तपास सुरू आहे. उच्चस्तरीय चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. त्याद्वारे दुर्घटनेची कारणे व इतर बाबींचा तपास केला जाणार आहे.

रविवारी (ता. ३) दुपारी ३.१५ वाजता नाशिकजवळ मध्य रेल्वेवरील गाडी क्रमांक ११०६१ एलटीटी ते जयनगर दरभंगा पवन एक्स्प्रेसचे १२ डबे रुळावरून घसरले. त्यानंतर रेल्वे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. मनमाड आणि भुसावळहून बचावकार्य पथक, वैद्यकीय पथक आणि आपत्कालीन विभाग घटनास्थळी पोहचला. प्रवाशांना सुखरूप काढण्यासाठी ११ खासगी बसची सोय करून त्यांना नाशिक रोड स्थानकापर्यंत पोहचविण्यात आले. नाशिक रोडला पोहचलेल्या प्रवाशांसाठी रात्री ११.५५ च्या सुमारास मुंबईहून रिकामी गाडी नेण्यात आली. त्यात प्रवाशांच्या खाण्या-पिण्याची व्यवस्था करण्यात आली होती, अशी माहिती मध्य रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली.
दुर्घटनेनंतर मुंबई विभागातील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, दादर, लोकमान्य टिळक टर्मिनस, ठाणे, कल्याण, इगतपुरी, भुसावळ नियंत्रण कार्यालय आणि भुसावळ स्थानक, मनमाड, नाशिक रोड, खंडवा, अकोला, चाळीसगाव, जळगाव, नागपूर, पुणे आदी स्थानकांत हेल्पलाइन क्रमांकाची व्यवस्था करण्यात आली आहे.

घसरलेल्या सर्व डब्यांना पुन्हा रुळावर ठेवून ट्रॅकचे काम तब्बल २३ तासांत पूर्ण करण्यात आले. त्यासाठी सुमारे ५०० अधिकारी व इतर कर्मचाऱ्यांनी २४ तास काम केले. चार जेसीबी, पाच पोक लेन, आठा हायड्रा आणि दोन अपघात मदत गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. रेल्वेचे कामकाज पूर्ववत करण्यासाठी अंदाजे २५० ते ३०० मीटरचा ट्रॅक बदलण्यात आला. चाचण्यांनंतर ट्रॅक आणि ओव्हर हेड वायरची देखभाल व दुरुस्ती करण्यात आली. दुपारी २.१५ वाजता डाऊन मार्ग वाहतुकीसाठी तयार करण्यात आला. त्यानंतर पहिली गाडी एलटीटी- गोरखपूर आज दुपारी २.५५ वाजता चालविण्यात आली.

मृत्यू झाला नसल्याचे स्पष्टीकरण
दुर्घटनेत कोणाचाही मृत्यू झालेला नाही. एका प्रवाशाला गंभीर दुखापत झाली असून त्याला लवकरच रुग्णालयातून सोडण्यात येईल. दोन प्रवाशांना साधी दुखापत झाली आहे, असे स्पष्टीकरण मध्य रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आले आहे.

Web Title: Todays Latest Marathi News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top