देशाला वाचविण्यासाठी मोदी सरकारला सत्तेतून घालविण्याचा संकल्प करा; काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांचे युवक काँग्रेसला आवाहन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

देशाला वाचविण्यासाठी मोदी सरकारला सत्तेतून घालविण्याचा संकल्प करा; काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांचे युवक काँग्रेसला आवाहन
देशाला वाचविण्यासाठी मोदी सरकारला सत्तेतून घालविण्याचा संकल्प करा; काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांचे युवक काँग्रेसला आवाहन

देशाला वाचविण्यासाठी मोदी सरकारला सत्तेतून घालविण्याचा संकल्प करा; काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांचे युवक काँग्रेसला आवाहन

sakal_logo
By

मोदी सरकार घालवण्याचा संकल्प करा

कुणाल राऊत यांच्या युवक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पदग्रहण सोहळ्यात नेत्यांचे आवाहन

मुंबई, ता. २३ ः केंद्राच्या धोरणामुळे देश मोठ्या संकटात सापडला आहे. देशाची वाटचाल ही हुकूमशाहीच्या दिशेने सुरू आहे, त्यासाठी समतेचे वातावरण नष्ट केले जात आहे. संविधान संपवले जात आहे, अर्थव्यवस्थेतील आलेले अपयश लपवण्यासाठी देशात धार्मिक द्वेष निर्माण केला जात आहे. त्यामुळे देशाला वाचवण्यासाठी मोदी सरकारला सत्तेतून घालवण्याचा, काँग्रेस आणि देशाला मजबूत करण्याचा संकल्प करा, असे आवाहन काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांनी युवक काँग्रेसला केले.

युवक काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी कुणाल राऊत यांची निवड झाल्यानंतर आज त्यांचा पदग्रहण सोहळा परळ येथील कामगार मैदानात मोठ्या दिमाखात साजरा झाला. या कार्यक्रमाला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, राज्यमंत्री विश्वजीत कदम, युवा नेते कन्हैया कुमार यांच्यासह काँग्रेसचे आमदार आदी पदाधिकारी या वेळी उपस्थित होते. या वेळी महाराष्ट्र प्रभारी एच. के. पाटील म्हणाले, की दरवर्षी दोन कोटी रोजगार देण्याचे आश्वासन देऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या आठ वर्षांत १६ कोटी बेरोजगार युवकांची फसवणूक केली. दोन कोटी युवकांना रोजगार तर सोडा, त्यापेक्षा अधिक युवकांच्या नोकऱ्या पळवल्या, त्यासाठी तुम्ही जबाबदार नाही का, असा सवाल त्यांनी मोदी यांना विचारला.

महसूल मंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले, की केंद्राचे दुर्दैवी राजकारण सुरू आहे. लोकशाहीची प्रतिष्ठा जपण्याची वेळ आहे. महागाई वाढली, केंद्रामुळे अनेक प्रश्न उभे राहिले आहेत. अशा स्थितीत हा देश राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली चालवायचा आहे. नेतृत्व घडवण्याची जबाबदारी तरुणांवर आहे. त्यासाठी युवक काँग्रसने पुढाकार घ्यावा, यातून काँग्रेस आणि देशही भक्कम होईल, असेही थोरात म्हणाले.

काँग्रेसचे युवा नेते कन्हैया कुमार यांनी आपल्या भाषणात केंद्र सरकारवर जोरदार तोफ डागली. हा देश आमचा सगळ्यांचा आहे. आम्ही बोलणे बंद केलंय, आम्ही घाबरलो नाही. हा देश संविधानानुसार चालेल. या देशाला आम्ही वाचवू. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्याप्रमाणे कमी मावळ्यांत लढाया जिंकल्या तशा आपल्याला जिंकायच्या आहेत. अनेकदा संख्या आवश्यक नसते. त्यासाठी साहस लागते. ते आता दाखवण्याची गरज असल्याचे ते म्हणाले.

मराठी वाचता येते, बोलता येत नाही, पण लवकरच मी मराठीत बोलेन. मी आपल्या मातृभाषेचा सन्मान करतो असेही ते म्हणाले.
माजी मुख्यमंत्री व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी युवक काँग्रेस हे काँग्रेस आणि देशाचे भवितव्य आहे, त्यामुळे राज्यव्यापी आंदोलन उभे करा, शिबिरे घ्या... आम्ही खांद्याला खांदा लावून सोबत असू, असे आश्वासन दिले. देशाची वाटचाल ही हुकूमशाहीच्या दिशेने सुरू आहे, त्यासाठी समतेचे वातावरण नष्ट केले जात आहे. अर्थव्यवस्थेतील आलेले अपयश लपवण्यासाठी देशात धार्मिक द्वेष निर्माण केला जात आहे. त्यामुळे येत्या काळात तुम्हालाही भडकावले जाईल, त्यासाठी कारस्थान केले जात आहे... त्यासाठी सावधगिरीने तोंड दिले पाहिजे...

काँग्रेस पक्षाची ताकद ही प्रत्येक गावात आहे... त्यासाठी आता येणाऱ्या निवडणुकीपूर्वी वातावरण तयार करावे. २०२४ पूर्वी १२ राज्यांच्या निवडणुकीत आपल्याला ताकदीने सामोरे जावे लागेल. मोदींनी २०२४ नंतर एकाही राज्यात काँग्रेसचा मुख्यमंत्री राहणार नाही असे जाहीर आव्हान दिलेले आहे. ते आव्हान आपल्याला मोडीत काढायचे आहे. ते आव्हान युवक काँग्रेसच्या तरुणांनी स्वीकारायचे आहे, असे चव्हाण म्हणाले.

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले, की राज्यातील युवक काँग्रेस हे सगळ्यात शक्तिशाली संघटन बनावे. पुढील काळात आम्ही ६० टक्के तरुणांना संधी देऊ. केंद्राने दोन कोटी तरुणांना रोजगार मिळवून दिला नाही. त्यांनी खोटे स्वप्न दाखवले, आज आपला खरा संघर्ष आहे... देशाला काँग्रेसने स्वातंत्र्य मिळवून दिले... महासत्ता बनवले... सर्वसामान्य माणसाला मुख्य प्रवाहात आणण्याचे काम केले. आता काँग्रेसला शक्तिशाली बनवायचे आहे... केंद्रातील सरकारची सत्ता उखडून टाकण्याचे काम महाराष्ट्रातील जनता करेल. आम्ही तसे आश्वासन दिले आहे. २०२४ मध्ये या देशाचे पंतप्रधान राहुल गांधी बनतील यावर मला विश्वास असल्याचे पटोले म्हणाले. विकासाच्या नावे नाही, तर धर्माच्या नावाने राजकारण ते करत आहेत. त्यामुळे तरुणांवर मोठी जबाबदारी आहे. तुम्ही काम केले नाही, तर संधी मिळणार नाही. काम करणारा कोणाचाही पोरगा असेल त्यांना संधी मिळेल. चमचेगिरी करणाऱ्यांना संधी दिली जाणार नाही, असेही पटोले यांनी स्पष्ट केले.

Web Title: Todays Latest Marathi News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top