पाचव्या-सहाव्या मार्गिकेनंतरही वेग मंदावलेलाच

पाचव्या-सहाव्या मार्गिकेनंतरही वेग मंदावलेलाच

Published on

मुंबई, ता. २५ : मुंबई आणि उपनगरातील लोकल प्रवाशांचा प्रवास जलद आणि आरामदायी होण्यासाठी फेब्रुवारीत ठाणे-दिवा स्थानकांदरम्यान नवी पाचवी-सहावी मार्गिका सुरू करण्यात आली; मात्र नव्या मार्गिकेमुळे लोकलचा प्रवास जलद होण्याऐवजी अधिक धीमा झाला आहे. अप मार्गाकडे दिवा स्थानकानंतर किंवा डाऊन मार्गाकडे ठाणे स्थानकानंतर लोकलचा वेग अधिक मंदावतो. त्यात स्वतंत्र मार्गिका असतानाही मेल-एक्सप्रेसची वाहतूकही तिसऱ्या-चौथ्या मार्गिकेवरूनच होत असल्याने लोकलच्या रखडपट्टीत आणखी भर पडते. या दैनंदिन त्रासाला प्रवासी वैतागले असून, नोकरीवर लेटमार्क लागत असल्याने आर्थिक भुर्दंडही सहन करावा लागत आहे.
मुंबई रेल्वे विकास महामंडळाद्वारे (एमआरव्हीसी) मुंबई नागरी वाहतूक प्रकल्पाअंतर्गत (एमयूटीपी-२) मध्य रेल्वेवरील ठाणे-दिवा पाचव्या-सहाव्या मार्गिकेचे काम सुरू होते. २००८मध्ये या प्रकल्पाला मान्यता मिळाली होती; मात्र विविध अडथळे पार करत अखेर फेब्रुवारी २०२२ मध्ये या मार्गिकेचे काम पूर्ण झाले. या दोन मार्गिकांमुळे लोकल फेऱ्यांची संख्या वाढली; मात्र जलद लोकल पारसिक बोगद्यातून जाणे बंद झाले. परिणामी जलद लोकलला मुंब्रा-कळव्याला मोठा वळसा घालून जावे लागते. त्यामुळे घड्याळाच्या काट्यावर धावणाऱ्या मुंबईकर प्रवाशांचे वेळेचे नियोजन बिघडले आहे.
मध्य रेल्वेच्या दिवा ते कल्याणदरम्यान पाचवी, सहावी स्वतंत्र मार्गिका आहे. यापूर्वी ठाणे ते दिवा दरम्यान ही मार्गिका नसल्याने जलद लोकलच्या उपलब्ध दोन मार्गिकांवरूनच एक्स्प्रेसही जात होत्या. त्यामुळे लोकलच्या वेळापत्रकावर मोठा परिणाम होत होता; मात्र आता ठाणे-दिवा पाचवी-सहावी मार्गिका तयार होऊनही लोकल विलंबाने धावत आहेत. विशेषतः कर्जत-कसारा या लांब पल्ल्याच्या अप-डाऊन जवळपास सर्वच लोकल तब्बल १५ ते २० मिनिटे विलंबाने धावत असल्याने प्रवाशांचे वेळापत्रकही बिघडत आहे.

रेल्वेची नेहमीचीच कारणे
पाचवी-सहावी मार्गिका तयार केल्यामुळे अनेक ठिकाणी वेगमर्यादा आहे. त्यामुळे जलद लोकलला इच्छितस्थळी पोहचण्यास विलंब लागतो. लोकमान्य टिळक टर्मिनस (एलटीटी) दिशेने जाणाऱ्या मेल, एक्स्प्रेस पारसिक बोगद्यातून जात आहेत; तर सीएसएमटी दिशेने जाणाऱ्या मेल, एक्स्प्रेस तिसऱ्या आणि चौथ्या मार्गिकेवरून धावत असल्याची माहिती मध्य रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.

ठाणे-दिवा पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेद्वारे प्रवाशांची फसवणूकच करण्यात आली आहे. सद्यस्थितीत केवळ चारच मार्गिकेचा वापर केला जात आहे. एक्स्प्रेसला स्वतंत्र मार्गिका अद्यापही नाही. पाचवी, सहावी मार्गिका तयार करताना योग्य नियोजन रेल्वे प्रशासनाने केलेले नाही. याचा फटका प्रवाशांना बसत आहे.
- सुभाष गुप्ता, अध्यक्ष, रेल यात्री परिषद
---------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com