
''आजी युवासेनेच्या कार्यकर्त्या'' : मुख्यमंत्र्यांकडून आजीबाईंचे कौतुक :
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २४ : मास्टर दीनानाथ फाऊंडेशनतर्फे दिला जाणारा लता मंगेशकर पुरस्कार स्वीकारण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईत आले असताना मुख्यमंत्र्यांनी मात्र निमंत्रण असूनदेखील त्या कार्यक्रमाकडे चक्क पाठ फिरवली. या दरम्यान मुख्यमंत्र्यांनी कुटुंबासह शिवसेनेच्या आंदोलनामध्ये चमकलेल्या ‘फायर आजी’च्या घरी जाऊन त्यांची भेट घेतली. मोदींच्या कार्यक्रमाकडे पाठ फिरवून मुख्यमंत्री आजीच्या भेटीला गेल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे.
अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी मातोश्रीवर येऊन हनुमान चालिसा पठण करण्याचे आव्हान दिल्यानंतर सर्व शिवसैनिक खवळून उठले. या आंदोलनात लक्ष वेधून घेतले ते ८० वर्षांच्या शिवसैनिक चंद्रभागा शिंदे यांनी. त्याही मातोश्री बाहेर भरउन्हात ठाण मांडून होत्या. ‘नवनीत राणा आणि रवी राणा यांनी मातोश्रीवर येऊन दाखवावेच. त्यांना आम्ही आमचा इंगा दाखवू. मी बाळासाहेब ठाकरेंपासून हाडाची शिवसैनिक आहे. झुकणार नाही,’ अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली होती.
आजीबाईंची हिंमत बघून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आजींना मातोश्रीवर बोलावून कौतुक केले होते आणि आजींना आराम करण्याचा सल्ला दिला होता. त्यानंतर आज स्वतः मुख्यमंत्री आपली पत्नी रश्मी ठाकरे आणि राज्याचे पर्यावरण, पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्यासमवेत चंद्रभागा शिंदे यांच्या परळ येथील घरी गेले. या वेळी आजींसह त्यांचे कुटुंबीयही खूप खूश झाले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज आमच्या घरी आले. त्यांचे पाय आमच्या घराला लागले. त्यामुळे आनंद झाल्याची भावना आजी चंद्रभागा शिंदेंनी बोलून दाखवली. मुख्यमंत्र्यांनी शिंदे यांचे आशीर्वाद घेतले. माझा आशीर्वाद सदैव तुमच्या पाठिशी असल्याचे आजी मुख्यमंत्र्यांना म्हणाल्या.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आजीच्या कुटुंबीयांचीही आस्थेने चौकशी केली. आजींसारखे शिवसैनिक हाच मला मिळालेला सर्वात मोठा आशीर्वाद आहे. ‘माणसाचं वय कितीही वाढले, तरी तो मनानं तरुण हवा, असे बाळासाहेब म्हणायचे. या आजी अजूनही तरुण आहेत. वय वाढले आहे; पण त्या अजूनही युवा सेनेच्याच कार्यकर्त्या आहेत,’ अशा शब्दांत ठाकरेंनी आजींचं कौतुक केले. मातोश्रीवर येऊन गेलात, आता वर्षावर सहकुटुंब या, असं निमंत्रण मुख्यमंत्र्यांनी दिले. उद्धव ठाकरे यांच्यामध्ये आम्हाला बाळासाहेब दिसत असल्याचे सांगत शिवसैनिकांच्या घोषणांनी सर्व परिसर दणाणून गेला.
......
Web Title: Todays Latest Marathi News
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..