घंटाधारी नव हिंदूंनी आम्हाला हिंदुत्व शिकवू नये , उद्धव ठाकरे

घंटाधारी नव हिंदूंनी आम्हाला हिंदुत्व शिकवू नये , उद्धव ठाकरे

घंटाधारी नवहिंदूंनी आम्हाला हिंदुत्व शिकवू नये!
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा विरोधकांना इशारा

भारतातील पहिल्या एनसीएमसी कार्डचे लोकार्पण

मुंबई, ता. २५ : बिनकामाचे भोंगे वाजवणाऱ्यांना हनुमान चालिसा म्हणायची असेल, तर अतिथी म्हणून आदराने या. घुसायची बात कराल, तर दादागिरी मोडून काढू. घंटाधारी नवहिंदूंनी आम्हा गदाधारी हिंदूंना हिंदुत्व शिकवू नये, असा टोला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज विरोधकांना लगावला. लवकरच एक सभा घेऊन या नवहिंदूंचा आणि तकलादू हिंदूंचा समाचार घेणार आहे, असा इशाराही त्यांनी मनसे नेते राज ठाकरे, भाजप आणि राणा दाम्पत्याचे नाव न घेता दिला.

भारतातील पहिल्या एनसीएमसी कार्डचा लोकार्पण सोहळा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते सोमवारी बेस्ट उपक्रमाच्या कुलाबा येथील मुख्य कार्यालयात पार पडला. त्या वेळी त्यांनी विरोधकांवर तोफ डागली. मुंबईसह राज्यात सध्या हनुमान चालिसा, भोंगा, हिंदुत्व आदी मुद्द्यांवरून मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे, भाजपचे देवेंद्र फडणवीस आणि इतर नेते, खासदार नवनीत राणा व आमदार रवी राणा यांच्याकडून जोरदार आरोप-प्रत्यारोप तसेच टीका करण्यात येत आहे. शिवसेनेला डिवचत रान उठवण्यात आले आहे. असे असले तरी उद्धव ठाकरे यांनी त्यावर भाष्य केले नव्हते. त्यांनी सोमवारी मात्र बेस्ट उपक्रमाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने विरोधकांवर टीकेची झोड उठवली.

राणा दाम्पत्याच्या हनुमान चालिसा प्रकरणावरही उद्धव ठाकरे यांनी खरपूस समाचार घेतला. हनुमान चालिसा वाचायची असेल, तर हिंदू संस्कृतीनुसार आदराने घरात या; पण घरात घुसण्याची भाषा कराल, तर तुमची दादागिरी मोडून काढू, असा इशारा त्यांनी दिला. मुंबईसह राज्यात सध्या भोंग्यावरून वेगळेच राजकारण सुरू आहे. त्याबाबत बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, की जे बिनकामाचे भोंगे वाजवतात त्यांना काडीची किंमत देत नाही. आम्ही जे करतो ते बेस्टच करतो. मात्र, ज्यांना ॲसिडिटी झाली आहे, मळमळते किंवा जळजळते आहे त्यांनी आपल्या राज्यात काय कामे केली, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

आम्ही हिंदुत्व सोडले म्हणता... अरे हिंदुत्व म्हणजे धोतर आहे का? घातले आणि सोडले. आमचे हिंदुत्व हे असे तकलादू नाही. जेव्हा बाबरी पाडली तेव्हा तुम्ही कुठल्या बिळात लपून बसला होतात, असा सवाल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपचे नाव न घेता उपस्थित केला. नवहिंदूंनी आम्हाला हिंदुत्व शिकवू नये. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी, देवळात घंटा बडवणारा हिंदू नको... अतिरेक्यांना बडवणारा हिंदू हवा, असे म्हटले आहे. त्यामुळे केवळ घंटाधारी हिंदूंनी आम्हा गदाधारी हिंदूंना हिंदुत्व शिकवू नये, अशा शब्दांत ठाकरे यांनी विरोधकांना खडसावले.
उपमुख्यमंत्री अजित पवार, पर्यावरण व पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे, परिवहन मंत्री अनिल परब, खासदार अरविंद सावंत, मुंबई महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल, बेस्टचे महाव्यवस्थापक लोकेश चंद्र, बेस्ट समितीचे माजी अध्यक्ष आशीष चेंबूरकर आदी मान्यवर या वेळी उपस्थित होते.

उपमुख्यमंत्र्यांचाही हल्लाबोल
हनुमान चालिसा वाचायला कुणाचा विरोध नाही. तुम्हाला वाचायची असेल, तर तुम्हाला तुमचे घर नाही का? तिकडेच (मातोश्री) जाऊन ती का वाचायची? चांगले वातावरण असताना ते बिघडवून कायदा-सुव्यवस्था धोक्यात का आणत आहात, अशा परखड शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राणा दाम्पत्याचे नाव न घेता समाचार घेतला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com