महापुराला रेल्वेचा भराव जबाबदार
महाड येथील नियंत्रण समितीचे म्हणणे तत्त्वतः मान्य
महाड, ता. ६ (बातमीदार) : शहरांत वारंवार येणाऱ्या पुराला कोकण रेल्वेने दासगाव येथे बांधलेल्या पुलाचा भराव कारणीभूत असल्याचा दावा पूरनियंत्रण समितीने केल्यानंतर आयआयटीतज्ज्ञ, कोकण रेल्वे आणि पूरनियंत्रण समितीने पुलाच्या परिसराची बुधवारी (ता. ५) पाहणी केली. समितीने या पूल आणि भरावासंदर्भात मांडलेली भूमिका कोकण रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी तत्त्वतः मान्य केली. महिनाभरात या पाहणीच्या अंतिम अहवालानंतर निर्णय घेण्यात येईल, असे कोकण रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
महाडमध्ये २२ जुलैला महापूर आला होता. या घटनेला कोकण रेल्वेने दासगाव पुलाजवळ केलेला भराव प्रमुख कारण ठरत असल्याचा निष्कर्ष खासदार सुनील तटकरे यांच्या अध्यक्षतेखाली २२ डिसेंबरला झालेल्या बैठकीत काढण्यात आला होता. कोकण रेल्वे, कोकण पाटबंधारे विकास महामंडळ, खारभूमी, महाड पूरनिवारण समितीचे अधिकारी आणि पदाधिकारी बैठकीला उपस्थित होते.
कोकण रेल्वेने नियुक्त केलेल्या आयआयटी मुंबई या संस्थेचा अहवाल देण्यापूर्वी या समितीच्या तज्ज्ञांनी प्रत्यक्ष घटनास्थळाची पाहणी करून नंतर निष्कर्ष काढून अहवाल सादर करावा, असे बैठकीत ठरवण्यात आले होते. त्यानुसार आयआयटी मुंबईचे प्रमुख राजेश गुप्ता, कोकण रेल्वेचे अधिकारी कपिल पाटील, महाडच्या प्रांताधिकारी प्रतिभा पुदलवाड, महाडचे तहसीलदार सुरेश काशीद, महाड पूरनिवारण समितीचे संजय मेहता व नितीन पावले आदी उपस्थित होते.
पाहणीनंतर प्रशासकीय अधिकारी आणि पूरनिवारण समितीच्या सदस्यांनी, महाडच्या महापुराला हा पूल आणि भराव कसा कारणीभूत ठरला आहे, हे कोकण रेल्वेचे अधिकारी आणि आयआयटीच्या तज्ज्ञांना पटवून दिले. त्यावर साधकबाधक चर्चा करण्यात आली. कोकण रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी हा पूल आणि भराव पुराला कारण ठरत असेल, तर काय उपाययोजना करता येतील याची माहिती देत, ते करण्याची तयारी दर्शविली. महिनाभरात अंतिम अहवाल तयार करण्यात येईल, असे कोकण रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
.....
कोकण रेल्वेला मदतीचा हात देणार
आयआयटीतज्ज्ञ, कोकण रेल्वे आणि पूरनियंत्रण समितीच्या पाहणी दौऱ्यादरम्यान कोकण रेल्वेने दासगाव पूल ते गोठे गावापर्यत टाकलेला भराव काढून टाकण्यासाठी लागणारा निधी कोकण रेल्वेकडे नसल्याचे सांगितले. त्यानंतर कोकण रेल्वेला निधीची उपलब्धता होत नसल्यास, लोकप्रतिनिधी आणि मंत्र्यांकडे पाठपुरावा करून निधी उपलब्ध करून देऊ, असे आश्वासन पूरनिवारण समितीच्या वतीने नितीन पावले यांनी कोकण रेल्वेच्या अधिकाऱ्यांना दिले.
......................................