माणगाव येथे खवले मांजराची तस्करी
पाच जण ताब्यात; महाड, भोर वन विभागाची कारवाई
महाड, ता.९ (बातमीदार) : माणगाव तालुक्यातील टोळ खुर्द या ठिकाणी खवले मांजराची तस्करी करणाऱ्या पाच जणांना वन विभागाने ताब्यात घेतले. महाड वन विभागाअंतर्गत खवले मांजराची तस्करीच्या घटनांत वाढ होत आहे. गेल्या दोन वर्षांतील ही तिसरी कारवाई आहे.
भोर वनपरिक्षेत्र अधिकारी एस. एस. मिसाळ यांना वन्य प्राण्यांचा तस्करी होत असल्याबाबत माहिती मिळाली होती. त्याआधारे भोर आणि महाडच्या वन विभागाने संयुक्तरित्या कारवाई करण्यात करून खवले मांजर आणि गुन्ह्यासाठी वापरण्यात आलेल्या तीन दुचाकी जप्त करण्यात आल्या. सुनील भाऊ वाघमारे (रा भेलोशी, महाड), सतीश कोंडीराम साळुंखे (कुंभेशिवथर, महाड), सूरज संतोष ढाणे (निनामपाडळी, सातारा), देविदास गणपत सुतार, (टोळ खु. माणगाव), शुभम प्रशांत ढाणे (निनामपाडळी, सातारा) यांना ताब्यात घेण्यात आले.
या प्रकरणी वन विभागाने वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ कलम ९, ३९ (अ), ३९ (२) (३), ४१ (१), (४), ५१ तसेच मुंबई वन्य जीव संरक्षण अधिनियम १९५१ चे कलम १ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. या सर्व आरोपींना १३ जानेवारीपर्यंत कोठडी सुनावण्यात आली. या कारवाईमध्ये भोर वनपरिक्षेत्र अधिकारी एस. एस. मिसाळ, महाड वन क्षेत्र अधिकारी राकेश साहू, वनरक्षक संदीप परदेशी, वनरक्षक रोहिदास पाटील, वनरक्षक समीर जाधव यांनी सहभाग घेतला होता.