पालीतील व्यावसायिक सावरले
भाविकांची गर्दी वाढल्याने समाधान
पाली, ता. ५ (वार्ताहर) ः नाताळच्या सुट्या आणि नवीन वर्षात अष्टविनायक तीर्थक्षेत्र पालीतील बल्लाळेश्वर मंदिरात भाविकांचा ओघ मोठ्या प्रमाणात सुरू झाला आहे. त्यामुळे मागील दोन वर्षांपासून आर्थिक विवंचनेत असलेल्या येथील शेकडो छोट्या-मोठ्या व्यावसायिकांना मोठा दिलासा मिळाला. देवस्थान कर्मचाऱ्यांच्या पगाराचा प्रश्न देखील मार्गी लागला आहे.
पुढील आठवड्यात मकरसंक्रांत आहे. त्यानंतर संकष्टी चतुर्थी, प्रजासत्ताक दिन व शनिवार, रविवारची सुट्टी यावेळी देखील मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी होईल. काही महिन्यांपूर्वी मंदिर उघडले असले तरी भाविकांचा ओघ कमी होता. त्यामुळे येथील व्यावसायिक उदरनिर्वाहासाठी धडपडत होते. मंदिर परिसरात हार, फुले, पेढे, खेळणी, सरबत, वडापाव, चहावाले, पापड, फळे, शोभिवंत वस्तू विकणारी १०० ते १५० दुकाने व हातगाड्या आहेत. तसेच छोटे-मोठे हॉटेल व लॉज व्यावसायिक, पान टपऱ्या आहेत. रानभाज्या व कंदमुळे विक्रीसाठी येणाऱ्या आदिवासी महिला, गृहोद्योग असे हजारो नागरिक प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरीत्या यावर अवलंबून आहेत.
रणजित खोडागळे या व्यावसायिकाने सांगितले की, काही महिने मंदिर बंद होते. त्यानंतर उघडले व पुन्हा बंद झाले. या दरम्यान भाविकांचे प्रमाण खूप कमी होते. या कालावधीत उत्पन्नाचे दुसरे कोणतेच साधन नव्हते. त्यामुळे कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी तारेवरची कसरत करावी लागत होती. मात्र मागील १५ दिवसांपासून मोठ्या प्रमाणात भाविक येत असल्याने आर्थिक घडी व्यवस्थित बसली.
प्रसाद बावकर या पेढे विक्रेत्या तरुणाने सांगितले की, भाविक कमी असल्याने मालाला उठाव नसल्याने तो फुकट जाऊन नुकसान होत होते. मात्र आता भाविक खूप येत असल्याने आता मालाला चांगला उठाव आहे.
मनोज मोरे या व्यावसायिकाने सांगितले की, व्यावसायिकांची परिस्थिती आता थोडी सावरली आहे. झालेले नुकसान भरून काढता येणार नाही, मात्र भाविकांचा ओघ असाच सुरू राहिल्यास उदरनिर्वाह चांगला चालेल.
....
कठीण परिस्थितीत श्री बल्लाळेश्वर देवस्थानतर्फे मुख्यमंत्री सहायता निधीसाठी पाच लाखांचा निधी दिला. ऑक्सिजन सिलिंडर, विविध उपकरणे देखील देण्यात आली. रक्तदान शिबिर राबविले. अन्नछत्र सुरू केले होते. सध्या भाविकांचा ओघ वाढल्याने सर्वच आनंदी आहेत. आता कर्मचाऱ्यांचा पगार देणे व रोजचा खर्च भागविणे काही प्रमाणात सुलभ होत आहे. स्थानिक अर्थव्यवस्थेला गती आणि चालना देखील मिळाली आहे.
- धनंजय धारप, अध्यक्ष, बल्लाळेश्वर देवस्थान ट्रस्ट.
....
भाविक कमी येत असल्याने अनेक लोकांचा रोजगार व रोजीरोटी बंद झाली होती. हातावर पोट असलेल्यांची तर फारच वाईट अवस्था झाली होती. अनेकजण कर्जबाजारी सुद्धा झाले. मात्र आता पुन्हा परिस्थिती रुळावर येऊ लागल्याने दिलासा मिळाला आहे. भाविक देखील आनंदी आहेत.
- राहुल मराठे, व्यावसायिक व विश्वस्त
पाली : बल्लाळेश्वर मंदिर परिसरातील खुली झालेली दुकाने व भाविकांची गर्दी.
पाली : बल्लाळेश्वर मंदिरात दर्शन घेताना भाविक.