माती, कुडा, बांबूची घरे फार्मात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

माती, कुडा, बांबूची घरे फार्मात
माती, कुडा, बांबूची घरे फार्मात

माती, कुडा, बांबूची घरे फार्मात

sakal_logo
By
माती, कुडा, बांबूची घरे फार्मात कृषी व इको टुरिझमसाठी घरांसाठी नैसर्गिक संसाधनांचा वापर अमित गवळे : सकाळ वृत्तसेवा पाली, ता. ८ : जिल्ह्यातील बहुतांश गावांमध्ये आजही मातीची घरे पाहायला मिळत आहेत. तर आदिवासी वाड्यापाड्यांवर कुडाची घरे दिसतात. मात्र, नैसर्गिक संसाधने वापरून बनवलेल्या या आकर्षक व आरामदायी घरांचा वापर आता कृषी व इको टुरिझमसाठी मोठ्या प्रमाणात होत आहे. अशा प्रकारे घरे बांधणाऱ्या कारागिरांची मागणीही वाढली आहे. शहरातील अनेक नागरिक अशा घरांमध्ये राहण्यास पसंती देत आहेत. पैसे खर्च करून या गोष्टींचा अनुभव घेत आहेत. मागील महिन्यात सुधागड तालुक्यातील इको आर्किटेक्ट तुषार केळकर यांनी भेरव येथे एका इको टुरिझम उपक्रमासाठी माती, कुडा, बांबू आणि लाकडाची विविध प्रकारची घरे बनवली आहेत. या आधी कोलाड येथे एका कृषी पर्यटन केंद्रामध्येही बांबू व कुडाची घरे बनवली आहेत. जिल्ह्यातील विविध भागांत सुरू असलेल्या कृषी व इको टुरिझम केंद्रांमध्ये अशा स्वरूपाची घरे बांधण्यात आली आहेत. या माध्यमातून ग्रामीण जीवनशैली, आरोग्यपूर्ण व निसर्गाच्या सानिध्यात राहण्याचा अनुभव शहरातील लोक घेत आहेत. शिवाय, यातून कृषी व इको टुरिझमला चालनाही मिळत आहे. याशिवाय अनेक फार्महाऊसवालेही आपल्या शेतात अशा प्रकारची घरे बांधण्यास पसंती देत आहेत. जिल्ह्यातील विविध ठिकाणी अशी घरे बांधलेली सध्या दिसत आहेत. कुडांचे घर बांधण्यासाठी सर्वांत महत्त्वाची साधनसामर्गी म्हणजे कारवीच्या काठ्या आणि माती. कारवीच्या लांब काठ्या तोडून आणल्या जातात. दगडी व मातीच्या पायावर कारवीच्या काठ्या उभ्या करून बांधल्या जातात. त्यावर माती आणि शेणाचा मुलामा दिला जातो. या कामासाठी कुशल हातांची व अनुभवाची गरज असते. मात्र, हे घर बनवण्यास वेळही खूप लागतो. घराच्या मध्यावर आणि बाजूने असलेल्या लाकडी खांबांवर लाकडाचे आडवे खांब टाकून त्यावर कौले किंवा ढापे रचले जातात. आतील जमीन चोपून शेणाने सारवली जाते. बाहेर छानसी पडवी काढली जाते. की झाले कुडाचे कौलारू घर तयार. अशाच प्रकारे बांबूचे घर बनवण्यात येते. मातीच्या घरामध्ये भिंती विटांच्या उभारून त्याला मातीचा लेप चढवला जातो किंवा तशाच ठेवल्या जातात. यावर नैसर्गिक कावेचा मुलामा चढवला जातो. चुण्याच्या साह्याने वारली चित्रकला किंवा नक्षीकाम करून अधिक आकर्षक बनवतात. --------------- कुडाच्या, मातीच्या व बांबूच्या घरांना इको टुरिझम आणि कृषी पर्यटनासाठी खूप अधिक मागणी आहे. शिवाय नैसर्गिक संसाधनांचा वापर होत असल्याने खर्चही कमी येतो. मात्र, तंत्रशुद्ध पद्धतीने अशी घरे बांधणारे खूप कमी कारागीर येथे आहेत. स्वतः अनेकांना याचे प्रशिक्षण देतो. परदेशातूनही अनेक जण शिकण्यासाठी येतात. तसेच मागणीप्रमाणे घरे बांधूनही देतो. - तुषार केळकर, इको आर्किटेक्ट, उद्धर, सुधागड -------------- नैसर्गिक घराचा थंडावा कारवीच्या काठ्यांना माती व शेण थापून तयार केलेल्या भिंती; तसेच मातीचे व बांबूच्या कौलारू छप्पर असलेल्या घरात थंडावा राहतो. उन्हाळ्यात तर ही घरे वरदानच ठरतात. शिवाय आकर्षकही दिसतात. मातीचा व शेणाचा वास प्रसन्न ठेवतो. प्रदूषणविरहित वातावरणात या घरांमध्ये राहण्याचा आनंद अनेकजण लुटतात आणि त्यासाठी अतिरिक्त पैसेही देतात.
Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top