देवेन मेहताचे अनधिकृत बांधकाम जमीनदोस्त
जिल्हा प्रशासनाची धडक कारवाई; बांधकामधारकांमध्ये चिंता वाढली
सकाळ वृत्तसेवा
अलिबाग, ता. ११ : तालुक्यातील अकृषक जमिनीचे दर गगनाला भिडले आहेत. त्यामुळे कृषी कारणास्तव परवानगी घेत व्यावसायिक हेतूसाठी जमिनीचा वापर करणाऱ्यांविरोधात जिल्हा प्रशासनाने धडक कारवाई सुरू केली आहे. सोमवारी तालुक्यातील सतिर्जे येथील टेकडी खोदून देवेन मेहता यांनी केलेले अनधिकृत बांधकाम तोडण्यात आले. या कारवाईने अनधिकृत बांधकाम करणाऱ्यांची चिंता वाढली आहे.
देवेन मेहता हे मुंबईतील व्यावसायिक असून, त्यांना जीएसटी अपहाराप्रकरणात अटक झाली होती, अशी माहिती महसूल तहसीलदार सचिन शेजाळ यांनी दिली आहे. सतिर्जे येथील १३३/५ व १३३/७ या मिळकतीमध्ये मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकाम करण्यात आलेले असल्याची तक्रार जिल्हाधिकाऱ्यांकडे एका व्यक्तीने केली होती. त्यानुसार केलेल्या चौकशीत येथे अनधिकृत बांधकाम केल्याचे उघड झाले होते. अलिबाग सार्वजनिक बांधकाम विभागाने मोजमाप घेतले, तेव्हा परवानगीपेक्षा वाढीव अनधिकृत बांधकाम केल्याचे निदर्शनास आले. त्याचप्रमाणे बांधकाम परवानगी हॉर्टीकल्चर प्रोजेक्ट या वाणिज्य कारणासाठी असताना सद्यस्थितीत त्याचा वापर रहिवासी कारणासाठी केला जात असल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले.
वाढीव अनधिकृत बांधकाम आणि वापरात बदल केल्यामुळे मेहता यांना जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांच्या आदेशान्वये १ डिसेंबरला अनधिकृत बांधकाम ३० दिवसांच्या आत स्वतःहून काढून टाकण्याचे आदेश देण्यात आले होते. मात्र, त्यांनी दिलेल्या मुदतीत ते न काढल्याने १० जानेवारीला जिल्हाधिकाऱ्यांनी उपविभागीय अधिकारी अलिबाग प्रशांत ढगे यांना कारवाईचे आदेश दिले होते. त्या अनुषंगाने ढगे यांच्या पथकाने मेहता यांच्या बंगल्याची वाडी आणि अनधिकृत बांधकामावर कारवाई केली आहे.