वनराई बंधारे बांधण्याकडे दुर्लक्ष

वनराई बंधारे बांधण्याकडे दुर्लक्ष

वनराई बंधारे बांधण्याकडे दुर्लक्ष अद्याप एकही बंधारा पूर्ण नाही; पिशव्यांची जमवाजमव सुरू सकाळ वृत्तसेवा अलिबाग, ता. १२ : ना स्वार्थासाठी ना राजकारणासाठी, फक्त एक धाव पाण्यासाठी; तसेच श्रमदान हेच सर्वश्रेष्ठ दान हे ब्रीद वाक्य घेऊन रायगड जिल्ह्यात दरवर्षी मोठ्या प्रमाणात वनराई बंधारे बांधण्यात येतात. या बंधाऱ्यातून रब्बी हंगामातील पिकांसाठी पुरेशा प्रमाणात पाणी उपलब्ध होत असल्याने या मोहिमेला ग्रामस्थ, सेवाभावी संस्थांकडून चांगला प्रतिसाद मिळत असतो; मात्र यावर्षी वनराई बंधारे बांधण्याच्या मोहिमेला मुहूर्तच सापडत नाही. बंधारे बांधण्यासाठी सध्या पिशव्या जमवण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे नदी-नाले कोरडे पडल्यानंतर वनराई बंधारे बांधणार का, असा प्रश्न येथील शेतकरी विचारू लागले आहेत. वनराई बंधारे बांधून घेण्याची जबाबदारी राज्य सरकारच्या कृषी विभागाकडे देण्यात आलेली आहे. पाऊस संपल्यावर साधारण नोव्हेंबर महिन्यात हे बंधारे बांधण्यास सुरुवात होते. पावसाळ्यात तुडुंब वाहणाऱ्या नदी-नाल्यांमध्ये तोपर्यंत काही प्रमाणात पाणी असते. हे पाणी बंधाऱ्यांद्वारे अडवून जास्तीत जास्त दिवस वापरता येईल, यासाठी विशेष प्रयत्न असतात. पिशव्यांमध्ये माती टाकून कमीत कमी खर्चात श्रमदानातून हे बंधारे बांधले जातात. जानेवारी-फेब्रुवारीपर्यंत कोकणातील नद्या पूर्णपणे सुक्या पडलेल्या असतात. ही वस्तूस्थिती माहिती असूनही कृषी विभागाने अद्याप या कामास सुरुवात केलेली नाही. त्यामुळे नद्या, लहान ओढे, नैसर्गिक पाणवट्यातील पाणी संपल्यानंतर बंधारे बांधण्यात काय अर्थ, असा प्रश्न येथील शेतकरी विचारू लागले आहेत. वाहते पाणी मातीचा बंधारा घालून अडवणे ही सरळ आणि साधी पद्धत यामध्ये वापरलेली असते. यासाठी सरकारच्या तिजोरीवर कोणताही भार पडत नाही. केवळ लोकसहभागातून हे काम होत असते. मात्र, संबंधित विभाग यात कोणतीही जबाबदारी घेत नसल्याचे दिसून येत आहे. वनराई बंधाऱ्यांचे उद्दिष्ट रायगड जिल्ह्यात २००५ पासून वनराई बंधारे बांधण्यास सुरुवात झाली. सुरुवातीला बंधारे बांधण्याची जबाबदारी जिल्हा परिषदेची होती. यात वनविभाग, कृषी विभाग, शिक्षण विभाग, ग्रामपंचायत विभाग, महसूल विभाग असे विभाग सक्रिय भाग घेऊन दोन ते तीन हजार वनराई बंधारे सहज बांधत असत. जिल्ह्यात सिंचन प्रकल्प कमी असल्याने दरवर्षी जास्तीत जास्त वनराई बंधारे बांधण्याचे उद्दिष्ट देण्यात येते. या बंधाऱ्यातून पाणी टंचाई कमी होणे, पशू-पक्ष्यांना पिण्याचे पाणी, शेतीसह इतर व्यवसायासाठी पाणी मिळत असल्याने नागरिकांकडून या योजनेस चांगला प्रतिसाद मिळत असतो. *** सिंचनासाठी मोठ्या प्रकल्पांवर कोट्यवधी रुपये खर्च करण्यापेक्षा लोकसहभागातून बांधण्यात येणाऱ्या वनराई बंधाऱ्यांमुळे पाणीटंचाई कमी होत आहे. मुरूड तालुक्यात उन्हाळी भाजीपाला पीक यशस्वीपणे घेता आलेले आहे. हा इतका चांगला उपक्रम असतानाही दुर्लक्ष केले जात असल्याचे वाईट वाटते. पाणी आटून गेल्यानंतर उद्दिष्टपूर्तीचे कागदी घोडे नाचवण्यात काय अर्थ? - शांताराम पाटील, प्रयोगशील शेतकरी *** वनराई बंधाऱ्याचे रायगड जिल्ह्यासाठी यावर्षी टार्गेट देण्यात आलेले नाही. पूर्णपणे लोकसहभागातून हे बंधारे बांधण्यात येणार आहेत. यासाठी पिशव्या जमवण्याचे काम सुरू आहे. आतापर्यंत किती बंधारे पूर्ण झाले आहेत, याची माहिती नाही. - उज्ज्वला बाणखेले, कृषी अधीक्षक कार्यालय, अधिकारी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com