किरवली गावातील नळपाणी योजना बंद
सहा महिन्यांपासून पाण्यासाठी वणवण
कर्जत, ता. १२ (बातमीदार) : तालुक्यातील किरवली गावात १७ वर्षांपूर्वी सुरू केलेली नळ पाणीपुरवठा योजना सहा महिन्यांपूर्वी बंद पडली. त्यामुळे पाण्यासाठी ग्रामस्थांना वणवण फिरावे लागते. या योजनेतील त्रुटी दूर करून ती त्वरित दुरुस्त करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
किरवली गावाची नळ पाणी योजना उल्हास नदीवर आधारित आहे. मात्र जुलै महिन्यात मुसळधार पावसात पाणी साठवण्याची विहीर कोसळली. पंपही नादुरुस्त झाला. तेव्हापासून ही योजना बंद आहे. त्यामुळे येथील महिलांना गावातील खासगी कूपनलिकेचा आधार घ्यावा लागतो. काही ग्रामस्थ टँकरद्वारे पाण्याची मागणी पूर्ण करतात; परंतु आर्थिकदृष्ट्या परवडणारे नाही. त्यामुळे जुनी पाणीपुरवठा योजना सुरू करण्याची मागणी करण्यात येत आहे.
---------------
किरवली गावाच्या पाणीपुरवठा योजनेत आमदार महेंद्र थोरवे यांनी लक्ष घातले असून ते लवकरच जल जीवन मिशनच्या माध्यमातून नवीन पाणी योजनेसाठी निधीची मिळवून देणार आहेत. जुलैच्या पावसात विहिरींची पडझड झाली. त्यावर बसविलेला वीज पंप ही नादुरुस्त झाला.
- संतोष साबरी, सरपंच, किरवली.