पालीवाला महाविद्यालयात
स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र
रायगड जिल्हाधिकाऱ्यांची संकल्पना
पाली, ता. २७ (वार्ताहर) : रायगड जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांच्या मार्गदर्शनाखाली पालीतील शेठ जे एन. पालीवाला महाविद्यालयात बुधवारी (ता.२६) स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राच्या नवीन बॅचचे उद्घाटन उपजिल्हाधिकारी अरुण उंडे यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष सु. ए. सोसायटीचे उपाध्यक्ष रवींद्र लिमये होते.
कार्यक्रमाला पाहुणे म्हणून तहसीलदार दिलीप रायण्णावार, पोलिस निरीक्षक विश्वजित काईंगडे, गटविकास अधिकारी विजय यादव, महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्या डॉ अंजली पुराणिक होते.
यावेळी रवींद्र लिमये यांनी सांगितले की, स्पर्धा परीक्षा तयारी करताना शेवटपर्यंत तग धरून राहिले पाहिजे. तरुणांनी आपल्या क्षमता ओळखणे आवश्यक आहे. ध्येय निश्चित करून त्यानुसार मार्गक्रमण करणे गरजेचे आहे.
उपजिल्हाधिकारी अरुण उंडे यांनी सांगितले की, स्पर्धा परीक्षेबाबत माहिती मिळणे व प्रबोधन होणे आवश्यक आहे. कमी वेळेमध्ये आपल्याला कसे अधिक साध्य करता येईल ते पाहावे. या परीक्षेसाठी जिद्द चिकाटी, परिश्रम व सातत्य हवे. विश्वजित काईंगडे यांनीही मार्गदर्शन केले.
सूत्रसंचालन प्रा. अजित खरोसे यांनी केले. आभार प्राचार्या डॉ. अंजली पुराणिक यांनी मानले.
उपप्राचार्य एम. एस. लिमन, सुधागड तालुका स्पर्धा परीक्षा प्रमुख प्रा. संतोष भोईर, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. स्नेहल बेलवलकर, प्रा. ज्ञानेश्वर मुंडे उपस्थित होते.