
कडाक्याच्या थंडीचा पशुपक्षांना फटका; शेकडो दगावल्याची पक्षी अभ्यासकांची नोंद
पाली : गेल्या आठवड्यात जिल्ह्यातील (Winter season) अनेक भागांत तापमानाचा पारा १४ अंश सेल्सिअसपर्यंत घसरला. या गारठ्याचा तडाखा चिमण्या, पाकोळी, धूळ पाकोळी, पावशा आणि कोंबड्यांसह (Birds death) अनेक प्रजातींना बसला. जिल्ह्यातील पक्षी अभ्यासकांच्या नोंदीमुळे ही बाब उघड झाली. पक्ष्यांचे प्रमुख खाद्य कीटक हे थंडीमुळे बाहेर पडत नव्हते. त्यामुळे पक्ष्यांची उपासमार झाली. माणगाव तालुक्यातील पाटणूस शाळेतील शिक्षक व पक्षी अभ्यासक राम मुंढे (Ram Mundhe) यांना प्रजासत्ताकदिनी विळे भागात धूळ पाकोळी निपचित पडलेली दिसली.
हेही वाचा: बोगदा खोदताना BMC चा अंदाज चुकला; टनेल बोअरिंग अडकल्याने कोट्यवधींचा फटका
हा पक्षी जखमी झाला असेल म्हणून त्यांनी हातात घेऊन पाहिले असता थंडीने तो पूर्णपणे गारठलेला होता. त्यांनी त्याला बॅगमध्ये अगदी सुरक्षित ठेवले. त्यानंतर दर ३० मिनिटांनी त्याचे निरीक्षण केले. त्याला बॅगमध्ये ऊबदार वातावरण असल्याने शांत बसून होता. त्यानंतर तो बरा झाला. त्याला सुरक्षित ठिकाणी मुक्त करण्यात आले. रोहा तालुक्यातील कोलाड येथील वाईल्डर वेस्ट ॲडव्हेंचर रेस्क्यू टीमचे सदस्य व सागर दहिंबेकर यांना येथील जंगलात थंडीमुळे अनेक चिमण्या व पाकोळी पक्षी मृत आढळले. काही पाकोळींना अंधत्व आले होते.
सरपटणाऱ्या प्राण्यांवरदेखील थंडीचा परिणाम झालेला आहे. दहिंबेकर यांना थंडीने दोन मृत घोणस साप आढळले. थंडीमुळे निपचित पडलेल्या पावशाला दहिंबेकर यांनी जीवदान दिले. दहिंबेकर यांनी वन विभागाच्या मदतीने वाचवलेल्या मोराच्या पिल्लांना थंडीमुळे मोठ्या प्रमाणात सर्दी झाली होती; तर शुभम सुतार या पोल्ट्री व्यावसायिकाच्या १९० कोंबड्या थंडीमुळे दगावल्या. पोल्ट्री व्यावसायिकांचेदेखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
हेही वाचा: सागरी महामार्ग तीन वर्षांत पूर्ण होणार; राज्य सरकारकडून १० हजार कोटींची तरतूद
अचानक आलेल्या कडाक्याच्या थंडीचा परिणाम पक्ष्यांवर अधिक प्रमाणात दिसून येत आहे. छोट्या पक्षांना अधिक फटका बसला आहे. त्यामुळे विविध ठिकाणी थंडीने पक्षी मृत व जखमी झाल्याच्या घटना घडल्या आहेत. कोणालाही एखादा गारठलेला पक्षी आढळला तर त्याला ऊब देऊन बरा झाल्यावर अधिवासात सोडून द्यावे. - राम मुंढे, पक्षी अभ्यासक व निरीक्षक
.जानेवारी महिन्यात जम्मू-कश्मीर व हिमाचल प्रदेश या राज्यांमध्ये होणाऱ्या अति बर्फवृष्टीमुळे उत्तरेकडील राज्यांमध्ये शीतलहर निर्माण झाली आहे. यामुळे आपले पशुधन सुरक्षित ठेवण्यासाठी आवश्यक उपाय योजले जावेत. थंडीमुळे रक्ताभिसरण संस्थेवर परिणाम होऊन हृदयविकाराचा झटका किंवा कोल्ड शॉकने पक्ष्यांची गती मंदावते किंवा मृत्यू ही होतो.
- डॉ. प्रशांत कोकरे, पशुधन विकास अधिकारी, सुधागड-पाली
Web Title: Todays Latest Marathi News
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..