मांडव्याची सुरक्षा होमगार्डच्या भरवशावर
पोलिसांचे दुर्लक्ष; पर्यटकांचा जीव धोक्यात
अलिबाग, ता. ३१ (बातमीदार) : सागरी सुरक्षा भक्कम करण्यासाठी राज्य सरकारकडून वेगवेगळ्या आधुनिक उपाययोजना करण्यात येतात; परंतु रायगड जिल्ह्यातील सर्वात अधिक वर्दळीचे बंदर म्हणून ओळख असलेले मांडवा चक्क होमगार्डच्या भरवशावर आहे. पोलिसांच्या या भूमिकेमुळे आश्चर्य व्यक्त करण्यात येते.
मुंबईतून जलमार्गाने रायगड जिल्ह्यात पर्यटनासाठी येणाऱ्यांसाठी मांडवा बंदर सोयीचे आहे. या बंदराच्या सुरक्षेची जबाबदारी मांडवा सागरी पोलिस ठाण्याची आहे; परंतु बंदरावर पोलिसांऐवजी होमगार्ड आणि मत्स्य व्यवसाय विभागाचे सुरक्षा रक्षक तैनात असतात.
काही वर्षांपूर्वी महाराष्ट्र मेरिटाईम बोर्डाच्या एका अधिकाऱ्याचा मृतदेह याच बंदराजवळ सापडला होता. याबाबत मांडवा सागरी पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल केला होता. त्यानंतरही सुरक्षेला प्राधान्य देण्यात येत नसल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येते.
मुंबईतून मांडव्यात येणाऱ्या प्रवाशांच्या बॅगांची तपासणी करण्यासाठी स्कॅनर नाही. त्यामुळेही सुरक्षेचा प्रश्न गंभीर होऊ लागला आहे. मांडवा पोलिसांनी याबाबत महाराष्ट्र मेरिटाईम बोर्डाकडे पत्र दिले आहे; परंतु त्यांच्याकडूनही कोणतीही हालचाल होत नसल्याचे सांगण्यात येते.
---------------------
प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने मांडवा बंदरावर सीसी टीव्ही कॅमेरे आहेत. सागरी मार्गाने पोलिसांची गस्त घातली जाते. या बंदरावर दोन पोलिसांची नेमणूक केली आहे. प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने ज्या ज्या उपाययोजना करायला पाहिजे त्या उपाययोजना करण्याचा प्रयत्न आहे.
- राजीव पाटील, सहायक पोलिस निरीक्षक, मांडवा सागरी पोलिस ठाणे.
...
असे आहे बंदराचे महत्त्व
मुंबई-मांडवा हा जलप्रवास अवघ्या पाऊण तासांचा आहे. त्यामुळे दिवसाला सुमारे तीन ते चार हजार प्रवासी या मार्गावरून प्रवास करतात. या बंदरामुळे रायगड जिल्ह्यातील पर्यटन व्यवसाय वृद्धीस मोठी मदत झाली आहे. सोयीच्या जलप्रवासामुळे अनेक प्रसिद्ध व्यक्तींसह व्यावसायिकांनी या बंदराच्या परिसरात बंगले बांधले आहेत.