वाढते नागरिकीकरण व औद्योगिकीकरण पाणथळ प्रदेशाच्या मुळावर

वाढते नागरिकीकरण व औद्योगिकीकरण पाणथळ प्रदेशाच्या मुळावर

Published on
पाणथळ भूमी दिवस ..... वाढते नागरीकरण पाणथळींच्या मुळावर रायगड जिल्ह्यातील पर्यावरणासाठी धोक्याची घंटा अमित गवळे ः सकाळ वृत्तसेवा पाली, ता. १ : सह्याद्रीच्या रांगा, पश्चिम घाट आणि विस्तीर्ण समुद्रकिनारा लाभलेल्या रायगड जिल्ह्यात जैवविधेतेने समृद्ध असे १३६ अधिकृत पाणथळ प्रदेश आहेत. ही सर्व पाणथळ क्षेत्रे २.२ हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रफळाची आहेत. मुंबई व पुण्यासारख्या मोठ्या शहरांच्या वेशीवर असलेला जिल्ह्यातील मागील काही वर्षांत वाढत चाललेले नागरीकरण आणि औद्योगिकीकरण या प्रदेशाच्या मुळावर आहे. त्यामुळे हा अमूल्य ठेवा संवर्धित करून आणखी वाढविण्याची आवश्‍यकता निर्माण झालेली दिसते. पाणथळ क्षेत्रात जैवविविधतेचा बहुमूल्य ठेवा आहे. तो वाचवण्यासाठी व जपण्यासाठी पाणथळ ठिकाणांचे संवर्धन होणे आवश्‍यक आहे. रायगड जिल्ह्यातील एकूण अधिकृत पाणथळ क्षेत्र १५४७ हेक्टर आहे. यामध्ये सर्वाधिक ३६ पाणथळ क्षेत्रे पनवेल तालुक्यात आहेत. आणि त्यांचे एकूण क्षेत्र ९९६ हेक्टर इतके आहे. मात्र मागील काही वर्षांत जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात औद्योगिकीकरण व नागरीकरणामुळे तसेच फार्महाऊस संस्कृतीमुळे पाणथळ प्रदेश भराव टाकून बुजविले जात आहेत; तर काही ठिकाणी पाणथळचा नैसर्गिक पाणीप्रवाह अडविला गेल्याने पाणथळ प्रदेशच संपुष्टात येतो. सांडपाणी व कारखान्यांतून सोडण्यात आलेली रसायने पाणथळ दूषित करत आहेत. परिणामी या सर्व कारणांमुळे येथील पशुपक्षी, जलचर, वनस्पती आदींचा अधिवास नष्ट होत आहे आणि त्यामुळे पर्यावरणास ही धोक्याची घंटा आहे. उरण तालुक्यातील पाणजे येथील समृद्ध असा पाणथळ बुजविण्याचा डाव पर्यावरणप्रेमींनी हाणून पाडला आहे. यासाठी न्यायालयीन व सरकारी स्तरावर लढादेखील दिला आहे. अशा प्रकारच्या चळवळी झाल्यास पाणथळ प्रदेश वाचू शकतील, असे जिल्ह्यातील प्रसिद्ध पर्यावरण आणि निसर्ग अभ्यासक प्रवीण कवळे यांनी सांगितले. ...... असे असतात पाणथळ प्रदेश नदी, तलाव, सागरकिनारे अशा ठिकाणी उथळ पाण्याने झाकलेल्या व अनेकविध प्रकारच्या गवतांनी आणि झुडपांनी भरलेल्या पाणथळ जमिनी आपल्याला आढळतात. यामध्ये धरणे, कृत्रिम तलाव व कालवे, मिठागरे, सांडपाण्याचे तलाव, मत्स्यशेती तलाव, शेततळी, भाताची खाचरे अशा मानवनिर्मित स्थळांचाही समावेश होतो. .... पाणथळ प्रदेशाचे महत्त्व जैविक विविधतेला जिवंत ठेवण्यात आणि ती वाढविण्यात पाणथळांची भूमिका अत्यंत मोलाची आहे. भूगर्भातील पाण्याचे पुनर्भरण करण्याचे काम असे प्रदेश करतात. प्रदूषित पाणी व इतर हानिकारक द्रव्ये अशा प्रदेशात फेकली जातात; परंतु पाणथळ जागी वाढणाऱ्या वनस्पती या घटकांना गाळण्याचे काम करून पाणी शुद्ध करतात. भातखाचरे आणि मत्स्यबीज-उत्पादनासाठी बनवलेली तळी हेसुद्धा पाणथळ प्रदेशच असल्याने त्यामधून जगभरातील ३ अब्ज लोकांना दररोजचे अन्न (भात आणि मासे) मिळते. सागरी किनारपट्टीवर असलेल्या अशा गवतयुक्त पाणथळ प्रदेशांमुळे लाटांनी होणारी किनाऱ्यांची धूप थांबवली जाऊन वादळांपासून होणारे नुकसानही घटते. शिवाय समुद्राचे आक्रमण थोपवून किनारी जमीन अति क्षारयुक्त (निरुपयोगी खारपड) होण्याची क्रियाही तेथील खारफुटी प्रकारच्या झुडपांमुळे कमी होते. नदीला पूर आल्यास किंवा अतिवृष्टी झाल्यासही हे जास्तीचे पाणी किनारी पाणथळ प्रदेशात मुरते व मानवी वस्ती जलमय होण्याच्या संभाव्य धोक्याचे प्रमाण कमी होते. विविध पक्षी व प्राण्यांच्या निरीक्षणासाठी हे प्रदेश पर्यटन क्षेत्र म्हणूनदेखील विकसित होऊ शकतात. ..... पाणथळ जागांचे/क्षेत्राचे संरक्षण व संवर्धन होणे अत्यावश्यक आहे. कारण या ठिकाणी मोठ्या प्रमाणात स्थानिक, स्थलांतरित व परदेशी पक्षांचा अधिवास व वावर असतो. - समीर शिंदे, वनक्षेत्रपाल, कांदळवने .........

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com