पाली, ता. ५ (वार्ताहर) : अष्टविनायक तीर्थक्षेत्र पाली नगरपंचायतीची पहिली निवडणूक नुकतीच झाली असून नगराध्यक्ष पदासाठी गुरुवारी (ता.१०) निवड होणार आहे. शुक्रवारी (ता.४) नगराध्यक्ष पदासाठी राष्ट्रवादीच्या गीता पालरेचा; तर शिवसेनेचे सचिन जवके यांचे अर्ज दाखल झाले आहेत.
नगरपंचायतीच्या १७ नगरसेवकांपैकी राष्ट्रवादी काँग्रेस व शेकाप आघाडीचे १० नगरसेवक निवडून आले आहेत. त्यामुळे आघाडीकडे स्पष्ट बहुमत आहे. परिणामी गीता पालरेचा यांचे पारडे जड आहे. शिवसेनेचे चार, भाजपचे २ आणि १ अपक्ष असे इतर नगरसेवक आहेत. काही राजकीय कूटनीती किंवा दगाफटका झाल्यास चुरस निर्माण होऊ शकते, अन्यथा शिवसेनेला लढत सोपी नाही.
उपनगराध्यक्ष पदासाठी गुरुवारी (ता.१०) सकाळी १० ते १२ यावेळेत अर्ज स्वीकारण्यात येणार आहेत. नगराध्यक्षपदाच्या निवडीनंतर १५ मिनिटांनी उपनगराध्यक्ष पदाचे अर्ज स्वीकारले जातील. दुपारी २ नंतर अर्जाची छाननी होऊन पुढील कार्यवाही केली जाईल, असे पीठासीन अधिकारी डॉ. यशवंत माने यांनी सांगितले.
पालरेचा यांचा अर्ज देताना राष्ट्रवादी व शेकापचे सर्व नगरसेवक सुधागड तालुका अध्यक्ष रमेश साळुंखे, रायगड जिल्हा परिषद सदस्य सुरेश खैरे, राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष ग. रा. म्हात्रे, दीपक पवार, शहर अध्यक्ष अभिजित चांदोरकर, तालुका युवक अध्यक्ष संदेश शेवाळे, प्रकाश पालरेचा, सुशील शिंदे, किरण खंडागळे व कार्यकर्ते उपस्थित होते; तर शिवसेनेचे सचिन जवके यांचा अर्ज दाखल करताना शिवसेनेच्या सर्व नगरसेवकांसह रायगड जिल्हा परिषदेचे सदस्य रवींद्र देशमुख, शिवसेना नेते राजेंद्र राऊत, संदीप दपके, सचिन डोबले, किशोर खरीवले, किरण पिंपळे, सतीश देशमुख व कार्यकर्ते उपस्थित होते.