
अलिबाग, ता. १२ : गावांतील पाणीपुरवठा योजनेची देखभाल करण्याची जबाबदारी ग्रामस्थांचीच आहे. यासाठी स्थापन करण्यात येणाऱ्या पाणीपुरवठा व स्वच्छता समितीवर आणखी जबाबदाऱ्या टाकण्यात आल्या आहेत. योजना आजारी पडणे, वीजबिल थकणे, पाणीपट्टीची वसुली यासह पाण्याचा अपव्यय टाळणे शक्य होणार असल्याचा दावा रायगड जिल्हा परिषदेने केला आहे.
‘जल जीवन मिशन’ची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी आणि ती अधिक परिणामकारक व्हावी यासाठी ग्रामपंचायत स्तरावर पाणीपुरवठा व स्वच्छता समितीची स्थापना करण्याचे निर्देश सरकारने दिले आहेत. त्यानुसार जिल्ह्यात सर्व ग्रामपंचायतींमध्ये ग्राम पाणीपुरवठा व स्वच्छता समित्यांची स्थापना करण्यात यावी, अशा सूचना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील आणि पाणी व स्वच्छता विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. ज्ञानदा फणसे यांनी केल्या आहेत.
महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमातंर्गत स्थापन होणारी ग्राम पाणीपुरवठा व स्वच्छता समिती ही ग्रामपंचायतीची उपसमिती आहे. पाणी व स्वच्छता प्रकल्पाची आखणी, नियोजन, अंमलबजावणी व देखभाल दुरुस्ती करण्याची जबाबदारी पाणीपुरवठा व स्वच्छता समितीची आहे. पाणीपुरवठा योजना यशस्वीपणे राबविण्याची जबाबदारी या समितीवर टाकण्यात आली आहे.
गावातीलच नागरिक या समितीवर असल्याने अंमलबजावणी अधिक प्रभावीपणे होण्यास मदत होणार आहे. जल जीवन मिशन अंतर्गत ग्रामीण भागातील प्रत्येक घरात वैयक्तिक न जोडणीद्वारे दरडोई किमान ५५ लिटर प्रतिदिन गुणवत्तापूर्ण पाणीपुरवठा करणे हे जल जीवन मिशनचे प्रमुख उद्दिष्ट आहे. तसेच स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) टप्पा-२ अंतर्गत वैयक्तिक शौचालये, संस्थात्मक शौचालयांचे बांधकाम व वापर याबरोबरच घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापनाची कामे करावयाची आहेत. त्यामुळे ग्रामपंचायत स्तरावर ग्राम पाणीपुरवठा व स्वच्छता समिती स्थापन करणे गरजेचे आहे.
***
पाणीपट्टीची वसुली, योजनेसंबंधीची देखभाल आणि दुरुस्तीसाठी स्थानिकांचा सहभाग यामुळे वाढणार आहे. आपल्या गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या योजनेची जबाबदारी आपल्यावरच असल्याने ही संकल्पना यशस्वी होत आहे. पाणीटंचाईवर मात करण्यास यातून काही प्रमाणात हातभार लागेल.
- डॉ. किरण पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी, रायगड जिल्हा परिषद.
.....
अशी आहे समितीची रचना
• या समितीचे अध्यक्ष सरपंच व सचिव ग्रामसेवक असतील.
• पाणीपुरवठा व स्वच्छता या समितीमध्ये किमान १२ सदस्य व जास्तीत जास्त २४ सदस्य असतील.
• समितीमधील एक तृतीयांश सदस्य ग्रामपंचायत सदस्यांतून निवडलेले असतील.
• या समितीत ५० टक्के महिला सदस्यांचा समावेश असेल.
• गावपातळीवरील महिला मंडळ, युवा मंडळ, भजन मंडळ, महिला बचतगट सहकारी संस्थांचे प्रतिनिधी असतील.
* ग्रामस्तरिय शासकीय, ग्रामपंचायत कर्मचारी आमंत्रित व सहकारी सदस्य म्हणून निवड करता येईल त्यांना मतदानाचा अधिकार नसेल.
• मागासवर्गीय समाजास योग्य प्रतिनिधित्व असावे.
• प्रत्येक वॉर्ड किंवा वस्तीतील किमान प्रतिनिधी सदस्य म्हणून असतील.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.