
म्हसळ्यातील चार गावांसाठीच्या पाणीपुरवठा योजनांना मंजूरी
अलिबाग, ता.१३ : म्हसळा तालुक्यातील चंदनवाडी, मांदाटणे, तोराडी, साळविंडा या चार गावांना नळजोडण्यांसाठी दोन कोटी ३९ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला. हजारो महिलांना पिण्याच्या पाण्यासाठी डोक्यावर हंडा घेऊन करावी लागणारी पायपीट या योजनांमुळे थांबणार आहे.
जल जीवन मिशन योजनेंर्तगत प्रत्येक घरापर्यंत नळाद्वारे शुद्ध पाण्याचा पुरवठा करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. या अभियाना अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या योजनांसाठी ४५ टक्के केंद्र सरकार, ४५ टक्के राज्य सरकार आणि १० टक्के स्थानिक लोकवर्गणीतून निधी उपलब्ध केला जातो. म्हसळा तालुक्यातील केलेटे ग्रामपंचायतीमधील चंदनवाडी गावासाठी बोअरवेल, थ्री एचपी पंप व नळजोडणी यासाठी २१ लाख रुपये मंजूर झाले आहेत, तर मांदाटणे योजनेमध्ये मांदाटणे, पाष्टी, पानदरे, मोरवणे ही चार गावे मोडत असून, मुख्यत्वे विहीर आणि पंपाद्वारे पाणी उचलून करण्यासाठी ९७ लाख २८ हजार रुपये मंजूर झाले. साळविंडा या योजनेत तीनही वाड्यांना गुरुत्ववाहिनीने पाणीपुरवठा, बंधारा, साठवण टाकी बांधण्यासाठी ९७ लाख ६४ हजार रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. तोराडी योजनेमध्ये विहीर, पंप, साठवण टाकी बांधण्यासाठी एकूण २३ लाख १८ हजार रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.
***
म्हसळा तालुक्यातील या चार पाणीपुरवठा योजनांसाठी मंजुरी व कार्यादेश प्राप्त झाला आहे. यामुळे या गावांतील पाणीटंचाई कमी होण्यास मदत होईल.
- युवराज गांगुर्डे, उपअभियंता, ग्रामपंचायत पाणीपुरवठा विभाग.
Web Title: Todays Latest Marathi News
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..