Wed, March 22, 2023

उंदीर आणि घुशीनी धुमाकूळ
उंदीर आणि घुशीनी धुमाकूळ
Published on : 22 December 2021, 11:11 am
शहरात उंदीर, घुशींचा धुमाकूळ
झोपडपट्टीसह उच्चभू सोसायटीतील नागरिकही त्रस्त
तुर्भे, ता. २२ (बातमीदार) : आधुनिक आणि सुनियोजित शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नवी मुंबईत शहरात उघड्या गटारामुळे उंदीर, घुशीची संख्या वाढत लागली आहे. एकीकडे भटक्या कुत्र्यांचा उपद्रव वाढला असताना आता उंदीर आणि घुशींनी धुमाकूळ घातला आहे. महापालिकेच्या पशुवैद्यकीय विभागाकडून उंदरांची संख्या वाढू नये यासाठी फवारणी, औषध टाकण्यात येत असले तरी गावठाण, झोपडपट्टीतील सांडपाणी वाहून नेणारी उघड्या नाल्यांमुळे उंदीर, घुशींचे प्रमाण वाढले आहे.
गावठाण व झोपडपट्टीत काही ठिकाणी सांडपाणी वाहून नेणारे नाले खुले तर काही बंदिस्त आहेत. मात्र बंदिस्त नालेही घुशी, उंदरांसाठी हक्काची ठिकाण झाले आहे. गटारावरील झाकडे बंद असली तरी आतील माती उकरून नाले भुसभुशीत केले आहेत. त्यामुळे नाल्यातील सांडपाणी झिरपणे, तुंबणे सारखे प्रकार वारंवार घडतात.
मनपा क्षेत्रातील घणसोली, कोपरखैरणे, दिघ्यासह आठ विभागात सांडपाणी वाहून नेण्यासाठी लहान, पसरट नाले आहेत. खुल्या नाल्यांत उंदीर, घुशीची मुक्तसंचार कायम सुरू असतो.
महापालिकेकडून ओला व सुका कचरा वर्गीकरणाबाबत वारंवार सांगितले जात असले तरी खरकटे, शिळे-खराब झालेले खाद्यपदार्थ अनेकजण कचऱ्यातच टाकत असल्याने उंदीर, घुशींना खाद्य मिळते. केवळ गावठाण, झोपडपट्ट्यांतच नव्हे तर उच्चभ्रू सोसायट्यांमध्येही उंदरांचा उपद्रव सहन करावा लागतो आहे.
उंदराच्या वाढत्या संख्येमुळे वाहनांचेही नुकसान होते. वाहनाच्या वायर कुरतडणे, सीट कुरतडणे आदी नुकसान सहन करावे लागते. त्यामुळे काहीजण उंदराच्या त्रासाला कंटाळून आपल्या वाहनात उंदीर नाशक गोळ्या ठेवतात.
प्रतिनिधी
नवी मुंबई महापालिकेच्या मूषक विभागातील कर्मचाऱ्यांना सूचना देऊन शहरातील खुले नाले, गटारे तसेच ज्या ठिकाणी उंदीर-घुशीची बिळे आहेत त्याठिकाणी फवारणी व गोळ्या टाकल्या जातील.
- डॉ. श्रीराम पवार, पशु वैद्यकीय अधिकारी
.....................
डासांची भुणभूण वाढली
तुर्भे (बातमीदार) : हिवाळा सुरू होताच शहरात डासांची भुणभूण वाढली आहे. त्यामुळे मलेरियाच्या रुग्णांची संख्याही वाढली आहे. खाडी किनारी असणाऱ्या कोपरखैरणे, कोपरी गाव, जुहूगाव, घणसोली व ऐरोली याठिकाणी डासांच्या प्रादुर्भावामुळे हैराण झाले आहेत. त्यामुळे बहुतांश नागरिक संध्याकाळ होताच दारे, खिडक्या बंद करून बसतात.
कोपरखैरणे भाग हा खाडीलगत असल्याने याठिकाणी डासांचा प्रादुर्भाव अधिक आहे. संध्याकाळी सहानंतर परिसरातील उद्याने व मैदाने रिकामी होतात. डासांचा त्रास होऊ नये म्हणून नागरिक मच्छरदाणी, अगरबत्ती तसेच लिक्विड, डास मारण्यासाठी इलेक्ट्रिक रॅकेटचा वापर मोठ्या प्रमाणात करू लागले आहेत. तर प्रत्येकाच्या हातात संध्याकाळ होताच डास मारण्यासाठी इलेक्ट्रिक रॅकेट घ्यावे लागते.
नवी शहरातील अंतर्गत रस्त्याला लागूनच पदपथ आणि त्याखाली झाकण बंद गटारे आहेत. मात्र महापालिका प्रशासनाने रस्ता रुंदीकरण व्हावे म्हणून काही ठिकाणी पदपथ काढून टाकले असून ती जागा रस्त्याला समांतर करण्यात आली आहे. मात्र याठिकाणी गटारांची झाकणे पूर्णपणे जाम झाली असून औषध फवारणी, धूर फवारणी होत नसल्याने डासांची पैदास वाढत आहे.
प्रतिक्रिया
हिवाळा सुरू झाला की डासांची संख्या वाढते. त्यामुळे आम्ही सहानंतर शक्यतो घराबाहेर पडतच नाही. घरातील खिडक्यांना डास येऊ नयेत यासाठी जाळी बसवली आहे. पण तरीही डासांचा त्रास कमी होत नाही.
- जयश्री वांद्रे, रहिवासी
फवारणी करण्यासाठी येणारे सोसायटीच्या बाहेरून थातुरमातूर फवारणी करून जातात. आठवड्यातून किमान दोनदा फवारणी केली जावी.
- महेश कांबळे, रहिवासी