नियम मोडणाऱ्या २८१७ रिक्षाचालकांवर कारवाई
नवी मुंबई वाहतुक विभागाची विशेष मोहीम
नवी मुंबई, ता. २२ (वार्ताहर) : बेजबाबदारपणे रिक्षा चालवून वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या रिक्षा चालकांविरोधात नवी मुंबई वाहतूक विभागाने २० डिसेंबरपासून विशेष मोहीम सुरू केली आहे. मोहिमेअंर्गत पोलिसांनी सोमवारी एका दिवसात तब्बल २८१७ रिक्षा चालकांविरोधात कारवाई केली. त्यामुळे रिक्षा चालकांचे धाबे दणाणले आहेत.
नवी मुंबई क्षेत्रात असलेले काही रिक्षाचालक मनमानी करीत असून वाहतुकीचे नियम न पाळता बेजबाबदारपणे रिक्षा चालवत असल्याच्या तक्रारी वाहतूक विभागाकडे आल्या आहेत. त्यांची दखल घेत नवी मुंबई पोलिस आयुक्तालयांतर्गत कार्यरत १६ वाहतूक शाखांच्या वतीने रिक्षा युनियन, रिक्षा चालक-मालक यांच्यासोबत एकत्रित बैठक घेऊन त्यांना वाहतूक नियमांचे पालन करण्यासंदर्भात आवाहन करण्यात आले होते. मात्र त्यानंतरही काही रिक्षाचालक नियमांचे पालन न करता, बेजबाबदारपणे रिक्षा चालवत असल्याचे आढळल्याने वाहतूक विभागाने कारवाईचा बडगा उगारला आहे.
विशेष मोहिमेअंतर्गत वाहतूक पोलिसांच्या १६ शाखांनी आपापल्या हद्दीत वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या एकूण २८१७ रिक्षांवर कारवाई केली. यापुढेही बेजबाबदारपणे रिक्षा चालकांविरोधात कारवाई सुरूच राहणार असल्याचे वाहतूक पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे रिक्षा चालक-मालकांनी वाहतुकीच्या नियमांचे पालन करून तसेच वाहतूक सुरळीत ठेवण्यास नवी मुंबई वाहतूक विभागास सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.