जलवाहिनीच्या दुरुस्तीमुळे कळंबोलीत पाणीटंचाई
चार दिवस पाणीपुरवठा खंडित झाल्याने नागरिक हैराण
पनवेल, ता. २२ (प्रतिनिधी) ः कळंबोलीतील नवीन जलवाहिन्या टाकण्याचे काम सुरू आहे. त्यासाठी सिडकोकडून पाणी पुरवठा खंडित करण्यात आल्याने वसाहतीतील काही भागात चार दिवसांपासून पाणी नाही. बुधवारी संतापलेल्या रहिवाशांनी सिडको कार्यालय गाठून अधिकाऱ्यांना जाब विचारला.
पनवेल महापालिकेतील कळंबोली, प्रभाग ८ मध्ये बैठ्या घरांचा गृहप्रकल्प आहे. सिडकोने विकसित केलेल्या या प्रकल्पातील घरांना पाणी पुरवठा करण्यासाठी सिडकोने टाकलेल्या जलवाहिन्या जुन्या आणि जीर्ण झाल्या आहेत. त्या बदलण्याचे काम काही दिवसांपासून सुरू आहे. यासाठी काही भागातील पाणी पुरवठा बंद करण्यात आल्याने गृहप्रकल्पातील चाळ क्रमांक सी व क्यूमधील जवळपास ८० घरातील रहिवाशांना चार दिवसापासून पाणी मिळत नसल्याने रहिवाशांकडून संताप व्यक्त होत आहे.
प्रतिक्रिया
नवीन जलवाहिन्यांचे काम सुरू असल्यामुळे पाणी पुरवठा खंडित होण्याची शक्यता आहे. या बाबत पूर्ण माहिती घेऊन लवकरात लवकर पाणी पुरवठा सुरळीत करण्यात येईल.
- प्रफुल्ल देवरे, अधिकारी, पाणी पुरवठा विभाग, सिडको
नवीन वाहिन्या टाकत असताना तात्पुरत्या स्वरूपात जुन्या वाहिनीतून पाणी पुरवठा सुरळीत ठेवणे अपेक्षित होते. मात्र तसे न झाल्याने चार दिवसापासून विकतच्या पाण्यावर तहान भागवावी लागते.
- उद्धव गंभीरे, रहिवासी