खास लग्नासाठी कोकणातील ‘डेस्टिनेशन बीच’ | Beach Wedding Destinations in Maharashtra | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Beach Wedding Destinations in Maharashtra
सागर किनारे’ घ्या...अविस्मरणीय ‘सात फेरे’

सागर किनारे’ घ्या...अविस्मरणीय ‘सात फेरे’, बिच वेडिंगसाठी चलो कोकण!

विवाह सोहळा हटके करण्याकडे अनेकांचा कल असतो. अशा दर्दींना समुद्राच्या लाटांचा आवाज, नारळी-पोफळीची सजावट अशा वातावरणात मंगलाष्टके आणि मग बोटीवर रिसेप्शनच्या फोटो शूटची नेहमीच भुरळ पडते. अशा अफलातून आणि वेगळ्या डेस्टिनेशनची गरज ओळखून ‘महाराष्ट्र पर्यटन संचालनालया’ने खास लग्नासाठी कोकण किनारपट्टी ‘डेस्टिनेशन बीच’ने सुसज्ज करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. (Beach Wedding Destinations in Maharashtra)

मागील काही वर्षांत बँक्वेट हॉलपेक्षा डेस्टिनेशन वेडिंगला अधिक पसंती मिळत आहे. सुरुवातीला वाड्यावर ‘ऐतिहासिक लग्न’ ही थीम बरीच गाजली होती. मात्र यंदाच्या लग्नसराईत यात ट्विस्ट पाहायला मिळत आहे. अलीकडे अनेक जोडपी समुद्र किनाऱ्यावर लग्नाचा पर्याय विचारात घेत आहेत; परंतु त्यासाठी ठिकाणे निवडताना काहीसा गोंधळ उडतो. अशी हटके कल्पना डोक्यात असणाऱ्यांसाठी आता फार दूर जाण्याची गरज नाही. महाराष्ट्रात बीच वेडिंगसाठी परवानगी असणारी काही ठिकाणे आपला लग्न सोहळा अविस्मरणीय करण्यासाठी महाराष्ट्र पर्यटन संचालनालयाकडून (Directorate of Tourism Maharashtra) ‘प्रमोट’ केली जात आहेत.

बीच वेडिंगमुळे सार्वजनिक ठिकाणच्या महत्त्वाच्या जागेसाठी कमी किंवा शून्य खर्च करावा लागणार आहे. त्यांच्या परवानगीसाठी बरीच धावाधाव करावी लागू नये यासाठी सध्या किनारा परिसरातील अगदी कमी दरात लग्नकार्यासाठी उपलब्ध असणारी अनेक रिसॉर्ट्स प्रमोट करण्यात येत आहेत. त्यात काही महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ अर्थात ‘एमटीडीसी’च्या (Maharashtra Tourism Development Corporation Resort) रिसॉर्टसचाही समावेश आहे.

डेस्टिनेशन/बीच वेडिंग हा केवळ आपल्याच देशात नव्हे तर जगभरात गाजलेला ट्रेंड आहे. आपला लग्नसोहळा अविस्मरणीय करण्यासाठी अनेक जोडपी अशा हटके ठिकाणांच्या शोधात असतात. महाराष्ट्राचा कोकण पट्टा अशा अनेक किनाऱ्यांनी समृद्ध आहे. हेच महत्त्व ओळखून आम्ही कोकण किनारपट्टी ‘डेस्टिनेशन बीच वेडिंग’साठी सुसज्ज करण्याच्या प्रयत्नात आहोत

-डॉ. धनंजय सावळकर, संचालक, पर्यटन संचालनालय, महाराष्ट्र

बिच डेस्टिनेशनचे काही पर्याय (Beach Wedding Venues in Maharashtra)

श्रीवर्धन (Shrivardhan Beach Wedding Destinations)

श्रीवर्धनच्या समुद्र किनाऱ्यावर शेकाडी येथे बीच वेडिंग संकल्पना सध्या रुजत आहे. या ठिकाणचे रिसॉर्ट्स अगदी कमी दरात आपल्याला राहण्याची, खाण्याची, सजावट व लग्नासाठीच्या परवानगीसह पॅकेज उपलब्ध करून देतात. श्रीवर्धनच्या पांढऱ्या वाळूच्या किनाऱ्यावर हा अनुभव नक्कीच लक्षणीय ठरतो. आपण ‘कोकण सर्च’ या संस्थेच्या संकेतस्थळावरून विविध रिसॉर्ट्सचे पर्याय तपासून पाहू शकतो.

हरिहरेश्वर (Harihareshwar Beach Wedding Destinations)

हरिहरेश्वर येथे बीच वेडिंगसाठी अनेक रिसॉर्ट्सचे पर्याय उपलब्ध आहेत, आपल्या बजेटनुसार आपण निवड करू शकतो. हरिहरेश्वर बीच रिसॉर्ट, ट्रँक्विल बीच रिसॉर्ट याशिवाय एमटीडीसी हरिहरेश्वर रिसॉर्ट हे जोडप्यांच्या ‘हिट लिस्ट’वर आहेत. अगदी चौपाटीवरच असणाऱ्या या रिसॉर्ट्सच्या आवारात आपण लग्नकार्य करत असल्याने परवानगीचा ताप कमी होतो.

अलिबाग (Beach Wedding Venues in Alibaug)

मिलिंद सोमण व अंकिता कोनवर यांच्या विवाहानंतर अलिबागमधील समुद्र किनारे लग्नकार्यासाठी बरेच प्रसिद्ध झाले आहेत. अलिबागमध्ये किहीम, वरसोली, अक्षी या चौपाट्यांवर अनेक बजेट फ्रेंडली रिसॉर्ट्स उपलब्ध आहेत. या ठिकाणी ग्रामपंचायत कार्यालयात काही शुल्क भरून आपण प्रत्यक्ष सुद्धा जागेचे बुकिंग करू शकतो. मुंबईपासून जवळ पर्याय शोधत असल्यास अलिबाग व गोराई बीचचे पर्याय उत्तम आहेत.

तारकर्ली (Tarkarli Beach)

तारकर्लीमध्येही (जि. सिंधुदुर्ग) बीच वेडिंगसाठी अनेक रिसॉर्ट्स उपलब्ध आहेत. यासाठी छोटेखानी कॉटेजचाही विचार होऊ शकतो. मालवण पट्ट्यावरील चिवला चौपाटी हे शांत आणि फार वर्दळ नसलेले ठिकाण एका खासगी लग्नासाठी बेस्ट ठरते. यासाठी ग्रामपंचायतीत अर्ज करावा लागतो. जर आपल्याला अगदीच काहीतरी भन्नाट करायचे असेल तर तारकर्ली येथे ‘स्कुबा डायव्हिंग वेडिंग’विषयी सुद्धा चौकशी करू शकता.

रत्नागिरी (Wedding Venues Ratnagiri)

रत्नागिरी शहरापासून काहीच अंतरावर असणारे काही समुद्रकिनारे अत्यंत शांत आणि मोहक आहेत. भाट्ये चौपाटी, देवघळी येथे सूर्यास्ताच्या रंगीत छटा पसरलेल्या असताना सात फेरे घेण्याचा अनुभव विचार करूनही अंगावर शहारा आणतो. देवघळी येथील टेबल पॉईंट हे लग्नमंडपासाठी एक मोहक ठिकाण ठरेल. यासाठी स्थानिक ग्रामपंचायत कार्यालयात विचारणा करू शकता.

Web Title: Todays Latest Marathi News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :wedding