लस न घेतलेल्यांचा कसून शोध
मुंबई, ता. २५ : राज्यातील लसीकरणाचा वेग आणखी वाढावा, यासाठी राज्य सरकार लसीकरणाला टाळाटाळ करणाऱ्यांचा कसून शोध घेणार आहे. वेगवेगळ्या उपाययोजनांसह नव्या पंचसूत्रीनुसार प्रत्येकाला लस देणे हा राज्य सरकारचा प्रयत्न आहे.
ज्यांचा पहिला आणि दुसरा डोस राहिला असेल त्यांच्या ‘हर घर दस्तक’ या मोहिमेअंतर्गत घरोघरी जाऊन याद्या तयार करण्यात आल्या आहेत. ज्या परिसरात असे नागरिक मोठ्या प्रमाणात आहेत, त्यांच्या घरानजीक त्यांच्या सोयीनुसार लसीकरण सत्रांचे आयोजन केले जात आहे. तसेच जे लोक कामावर जातात, त्यांच्या सोयीसाठी रात्री उशिरापर्यंत लसीकरण सत्र सुरू ठेवली जात आहेत. प्रत्येक जिल्ह्यांत कॉल सेंटरमार्फत म्हणजेच फोनद्वारे त्यांचा पाठपुरावा केला जात आहे. याशिवाय मोबाईल टीम्स सक्रिय करण्यात आल्या आहेत. या मोबाईल टीम्समार्फत नागरिकांना लसीकरण केले जात आहे. अशा वेगवेगळ्या आणि नवीन पद्धतीने लसीकरणाचा वेग वाढावा, यासाठी उपक्रम राबवले जात आहेत. या नव्या उपक्रमांमुळे लसीकरण जास्तीत जास्त प्रमाणात होईल, अशी आशा राज्य अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.
राज्यात गेल्या दोन दिवसांपासून १३ लाखांहून अधिक लाभार्थ्यांना लसीकरण केले जात आहे. त्यात अजूनही पहिला डोस घेण्याचे प्रमाण अधिक असल्याचे राज्य सरकारच्या आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे.
...