थर्टी फर्स्टनिमित्त मद्य तस्करीवर नजर!
केंद्रशासित प्रदेशातून पालघरमध्ये होणारी तस्करी रोखण्यासाठी तपासणी नाके
मनोर, ता. २५ : नववर्षाच्या स्वागतानिमित्त होणाऱ्या पार्ट्यांमध्ये मोठ्या प्रमाणात मद्य रिचवले जाते. त्यामुळे मद्याला मोठी मागणी असते. या कालावधीत पालघर जिल्ह्यात केंद्रशासित प्रदेशातून महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेले मद्य स्वस्त दरात उपलब्ध करून देणाऱ्या तस्करीत वाढ होते. त्या पार्श्वभूमीवर उत्पादन शुल्क विभागाने कडेकोट बंदोबस्त लावला असून सीमा भागात चार तपासणी नाके आणि तीन गस्ती पथकांद्वारे अवैध मद्य तस्करी रोखण्यात येणार आहे.
पालघर जिल्ह्यातील तलासरी आणि जव्हार तालुका केंद्रशासित प्रदेश असलेल्या दादरा नगर हवेलीला लागून आहे. केंद्रशासित प्रदेशातून या मार्गाने पालघर जिल्ह्यात दादरा नगर हवेली आणि दमन बनावटीची दारूची मोठी तस्करी होते. तस्करीसाठी सीमेलगतच्या दुर्गम भागांचा वापर दारू तस्करांकडून केला जातो. थर्टी फर्स्टनिमित्त तर केंद्रशासित प्रदेशातून सीमेवरून मोठी दारू तस्करी होते. हे तस्करी रोखण्यासाठी उत्पादन शुल्क विभाग सक्रिय झाला आहे.
केंद्रशासित प्रदेशातून होणारी तस्करी रोखण्यासाठी उत्पादन शुल्क विभागाने सीमा भागात तपासणी नाके आणि गस्ती पथके तैनात केली आहेत. झाई, उपलाट-कोचाई, खांबाळा आणि तलासरी येथे तपासणी नाके आहेत. उत्पादन शुल्क विभागाच्या पालघर कार्यालयातील भरारी पथक, ठाणे विभागीय कार्यालयाचे भरारी पथक आणि राज्य स्तरावरील भरारी पथकांच्या माध्यमातून सीमा भागात गस्त घालण्यात येणार आहे. उत्पादन शुल्क विभागाच्या विभागीय कार्यालयातून सीमा तपासणी नाक्यांवर कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे.
कोट --
महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित मद्य तस्करीवर तपासणी नाके आणि गस्ती पथकांच्या माध्यमातून कारवाईसाठी केली जाते. डिसेंबर महिन्यात तस्करी वाढत असल्याने कारवाईसाठी तपासणी नाक्यांची नेमणूक केली आहे. उत्पादन शुल्क विभागाने वर्षभरात केलेल्या कारवाईत ९१३ गुन्हे दाखल केले असून ७३९ आरोपींना अटक करण्यात आली आहे. यात १५१ वाहनांसह ४ कोटी ७६ लाख ७० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
- डॉ. विजय भूकन, अधीक्षक, उत्पादन शुल्क विभाग, पालघर.