वर्षाच्या शेवटच्या दिवशी शेअर बाजारात तेजी
सेन्सेक्समध्ये ४५९ अंशांची वाढ
नवी दिल्ली, ता. ३१ ः वर्षाच्या शेवटच्या दिवशी आज शेअर बाजारात तेजी पाहायला मिळाली. बॉम्बे स्टॉक एक्सचेंजचा सेन्सेक्स ४५९ अंशांच्या वाढीसोबत ५८,२५३ वर बंद झाला; तर निफ्टीत १५० अंशांची वाढ होऊन १७,३५४ वर बंद झाला. आज गुंतवणूकदारांना १० लाख कोटींचा फायदा झाला.
कालच्या घसरणीनंतर सेन्सेक्सने ५५ अंशांच्या वाढीसह ५७,८४९ वर सुरुवात केली. पहिल्या मिनिटातच तो ५८ हजारांच्या पार गेला. दिवसभरात सेन्सेक्सने ५८,४०९ चा उच्चांकी, तर ५७,८४६ चा निच्चांकी स्तर गाठला. सेन्सेक्सच्या ३० पैकी केवळ ४ शेअर्समध्ये घसरण झाली, तर २६ शेअर्समध्ये मोठी वाढ झाली. टाइटन, एअरटेल, ॲक्सिस बँक, कोटक बँक, महिंद्रा अँड महिंद्रा, बजाज फिनसर्व या शेअर्समध्ये वाढ झाली. त्याशिवाय आयसीआयसीआय, रिलायन्स, मारुती, एसबीआय, एशियन पेन्ट्स यांचे शेअर्स देखील वाढले; तर टेक महिन्द्र, डॉ. रेड्डी, एनटीपीसी या शेअर्समध्ये घसरण नोंदवली गेली.
दुसरीकडे निफ्टीच्या ५० पैकी ४५ शेअर्शमध्ये वाढ झाली. वाढ होणाऱ्या शेअर्समध्ये हिंदालको, टाइटन, ॲक्सीस बँक, टाटा मोटार्स, कोटक बँक यांचा समावेश आहे; तर टेक महिन्द्र, एसबीआय, सिप्ला या शेअर्समध्ये घसरण झाली.