प्रीमियर

प्रीमियर

आमची बकेट लिस्ट नवीन वर्ष येताना सोबत नवीन कल्पना, नवीन इच्छा, नवीन स्वप्न घेऊन येत असतं. त्यानुसार नवीन योजना आखल्या जातात. म्हणजेच एक बकेट लिस्ट बनवली जाते. प्रत्येकाची एक तरी छोटी वा मोठी बकेट लिस्ट असते. अशीच काही कलाकारांची बकेट लिस्ट आपण जाणून घेऊयात. आरोग्याकडे विशेष लक्ष सुयश टिळक ः हे नवीन वर्ष गेल्या दोन वर्षांपेक्षा वेगळं असेल हे निश्चित. मला खूप फिरायची इच्छा आहे. कोविडमुळे गेल्या दोन वर्षांत हवं तसं मनमोकळेपणानं फिरणं झालेलं नाही. मेघालय, हिमालय वगैरे ठिकाणी फिरायची खूप इच्छा आहे. रोजच्या कामामुळे स्वतःकडे जास्त लक्ष देता येत नव्हतं. पण या वर्षात मला स्वतःकडे, माझ्या शारीरिक स्वास्थ्याकडे लक्ष द्यायचं आहे. आरोग्याकडे विशेष लक्ष देणं आवश्यक आहे. अजूनही कोरोना संपलेला नाही. अशा वेळेत आरोग्याची विशेष काळजी घेतली तर त्याचा फायदाच होणार आहे. ......... नाटक दिग्दर्शित करायचंय... तेजश्री प्रधान ः या वर्षी मला एखाद्या नाटकाचं दिग्दर्शन करायला आवडेल. अभिनय व लिखाण हे देखील माझं सुरूच असतं. पण या वर्षात एखाद्या नाटकाचं दिग्दर्शन करायची माझी फार इच्छा आहे. त्याचसोबत मला ट्रेकिंग फार आवडतं तेही हिमालय भागात. नवीन जागी फिरायला जायला मला फार आवडतं आणि ते करायचं देखील आहे. नवीन जागेच्या गोष्टी तसेच तेथील काही वेगळ्या घडामोडींचा इतिहास हे सगळं जाणून घ्यायचं आहे. त्याचबरोबर एखादा ट्रॅव्हल कार्यक्रम करत फिरता आलं तर तो अगदी दुग्धशर्करा योगच असेल माझ्यासाठी. कोविडमुळे आजूबाजूला राहणाऱ्या तसेच वावरणाऱ्या लोकांबद्दल देखील एक आपुलकी वाटायला लागली आहे. अशा अगदीच अनोळखी नाही, पण अगदीच ओळखीत नसलेल्या आजूबाजूच्या लोकांशी जवळीक वाढवायची आहे. त्यांच्या काही अडचणी समजून त्यात त्यांना मदत करायची आहे. ...... नवीन गोष्टी शिकणार... सौरभ चौघुले ः येत्या वर्षातच नाही तर मला कायमच नवीन काही तरी शिकायचं असतं. आता या वर्षी मला वाद्य शिकायचं आहे. मी अधूनमधून माऊथ ऑर्गन वाजवत असतो. तेच मला या वर्षात व्यवस्थित शिकायचं आहे. त्यासोबत या नवीन वर्षात गुंतवणूक करण्याचाही विचार आहे. शेअर मार्केट शिकत आहे. त्यातच पुढे जाऊन गुंतवणूक करायचं आहे. मला स्वतःला फिरायला जायची इच्छा आहे. पण त्या आधीही मला माझ्या आई-बाबांना फिरायला पाठवायचं आहे. त्यांच्यासाठी एखादी ट्रिप काढायची आहे. माझ्या बकेट लिस्टमधली सगळ्यात महत्त्वाची इच्छा ती म्हणजे कलर्स मराठीची ट्रॉफी मिळवणं. त्यासाठी माझ्या अभिनयात किती सुधारणा करता येईल याचा प्रयत्न मी करीत आहे. ........... आईसोबत क्रूझवर जायचंय केतकी माटेगावकर ः यंदाच्या वर्षात भरपूर काम करायचं आहे. भरपूर गाणी कम्पोझ करायची आहेत. माझं कामच माझी आवड आहे. त्यामुळे कामात मग्न असताना मला खरंच खूप आनंद मिळतो. गाण्यासोबतच मला अभिनयातसुद्धा वेळ घालवायचा आहे. नवीन वर्षात सिनेमा करण्याची देखील इच्छा आहे. त्यासाठी प्रयत्नही चालू आहेत. नवीन ठिकाणी फिरायचं आहे. जिथे आजपर्यंत गेले नाही अशा ठिकाणी जायला आवडेल. याव्यतिरिक मला माझ्या आईसोबत वेळ घालवायचा आहे. मला आईसोबत क्रूझवर फिरायला जायचं आहे. आम्ही दोघीही आपापल्या कामात व्यग्र असल्यामुळे आम्हाला हवा तसा वेळ मिळत नाही. त्यामुळे आता आम्हा दोघींना छान गप्पागोष्टी व मजा मस्ती करायला वेळ हवा आहे. ............... केदारनाथला जायचं आहे गौरव मालवणकर ः रोजच्या जीवनात शरीराकडे तसेच आहाराकडे तेवढंसं लक्ष देता येत नाही किंवा दुर्लक्षच होत असतं. पूर्वी माझा समज असा होता की, अभिनेत्याला अभिनय येणं गरजेचं आहे, बाकी काही नसेल तरी चालेल. पण आता हळूहळू मलाही असं वाटतंय की, अभिनयासोबत शरीराकडे लक्ष देणं आवश्यक आहे. म्हणून आता मला जिम लावायची आहे. या वर्षांत आवर्जून वेळ काढून मला केदारनाथला जायचं आहे. केदारनाथला जायचं हे खरं तर माझ्या बकेट लिस्टमध्ये सगळ्यात वरच्या स्थानी आहे. घरात आई-बाबा असल्यामुळे सगळं वेळेत मिळत असतं. पण आता भाड्याच्या घरात राहून जबाबदारी पेलायची आहे. जबाबदारी काय असते ते अनुभवायचं आहे. शब्दांकन ः रेवती देशपांडे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com