उद्याने व मैदानांचे सुशोभीकरण होणार
निवडणुकीच्या तोंडावर महापालिका क्रियाशील
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १ : या वर्षात महापालिकेच्या निवडणुका होण्याची शक्यता लक्षात घेऊन विकासकामांबरोबर सुशोभीकरणाच्या कामालाही वेग आला आहे. उद्याने, मैदाने, चौकांच्या सुशोभीकरणाच्या प्रस्तावांचा पाऊस पडू लागला आहे. आता महापालिकेने चारकोप तलावांच्या सुशोभीकरणासाठी निविदा मागवल्या आहेत.
निवडणुकीच्या तोंडावर महापालिकेने २ हजार २०० कोटी रुपयांच्या रस्तेदुरुस्तीची कामे मंजूर केली आहेत. त्यानंतर मुंबईतील सहा उद्याने, मैदानाच्या सुशोभीकरणासाठी कोट्यवधी रुपयांच्या प्रस्तावाला गेल्या आठवड्यात स्थायी समितीने मंजुरी दिली आहे. चारकोप येथील तलावांच्या शुद्धीकरणासोबतच सुशोभीकरणासाठी महापालिकेने निविदा मागवल्या आहेत. यासाठी आठ कोटी १८ लाख रुपयांचा खर्च अंदाजित केला आहे.
जानेवारीच्या पहिल्या आठवड्यापर्यंत या निविदा सादर करायच्या आहेत. सर्व परवानग्या मिळाल्यानंतर पावसाळावगळता १८ महिन्यांत हे काम पूर्ण होणार आहे. चारकोप येथील तलावातील माशांचा मोठ्या प्रमाणात काही वर्षांपूर्वी मृत्यू झाला होता. या तळ्यात रसायनमिश्रित पाणी आल्याची शक्यता वर्तवली जात होती. त्यानुसार पालिकेने तत्काळ कारवाईही केली. तसेच, स्थानिक नागरिकांनीही या तळ्याच्या स्वच्छतेसाठी मोहीम हाती घेतली होती.
-------
काय कामे होणार
- तलावाला गणेशघाट बांधण्यात येणार
- गॅबियन पद्धतीने तलावात नैसर्गिक भिंत बांधण्यात येणार.
- या गॅबियन भिंतीवर लाकडी डेक ब्रिज बांधण्यात येणार.
- तळ्याच्या तळाला दगडांची रास रचण्यात येणार.
- आकर्षक विद्युत व्यवस्था, आसनव्यवस्था करण्यात येणार
---------
या सुविधा असणार
या तळ्याचे सुशोभीकरण करताना त्याचे लॅन्डस्केपिंगही करण्यात येणार आहे. तसेच, लहान लहान रोपांनी हा परिसर सजवण्यात येणार आहे. खासकरून फुलझाडे लावण्यात येणार आहेत. हा तलाव स्थालांतरित तसेच देशी पक्ष्यांचे आश्रयस्थान आहे. तळ्यात असलेल्या माशांमुळे तसेच जवळील खारफुटी व दलदलीमुळे या परिसरात मोठ्या प्रमाणात स्थालांतरित पक्षी येत असतात. या तलावाच्या परिसरात खुली व्यायामशाळा तयार करण्यात येणार आहे. तसेच, लहान मुलांना खेळण्यासाठी जागाही तयार करण्यात येणार आहे. विरंगुळा म्हणून कारंजाही बनविण्यात येईल.