महापालिकेच्या संकुलांमधील सुशोभीकरण महागणार
शुल्कात पाच टक्के वाढ
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता.१ : महापालिकेच्या संकुलांमधील कायमस्वरूपी सुशोभीकरणाच्या शुल्कात पाच टक्के वाढ करण्याचा प्रस्ताव या महिन्याच्या महासभेत मांडण्यात आला आहे. तसेच, दरवर्षी पाच टक्के वाढ करण्याची परवानगीही प्रशासनाने मागितली आहे. त्यामुळे आता सुशोभीकरणही महागण्याची शक्यता आहे.
संकुलांमध्ये कारंजे, सुशोभित हौद, दगडांच्या-खडकांच्या कलाकृती, कृत्रिम धबधबे अशा प्रकारचे सुशोभीकरण करायचे असल्यास महापालिकेच्या किटकनाशक विभागाची परवानगी घ्यावी लागते. तसेच, त्यासाठी शुल्कही द्यावे लागते. यासाठी वार्षिक ६ हजार ५०० रुपये शुल्क, तसेच २० हजार रुपयांची अनामत रक्कम भरावी लागते. या शुल्कात पाच टक्के वाढ करून ते ६ हजार ८२५ रुपये करण्यात येणार आहे. तसेच, अनामत रक्कम २० हजारांवरून २१ हजार रुपये करण्यात येणार आहे. तसा प्रस्ताव महासभेच्या पटलावर मांडण्यात आला आहे. या वाढीव शुल्कामुळे आर्थिक वर्षात पालिकेला दोन लाख ६१ हजार रुपयांचे उत्पन्न मिळणार आहे.
गेल्या तीन वर्षांत या शुल्कात वाढ झालेली नाही. मात्र, पालिकेच्या प्रशासकीय खर्चात तसेच महागाईतही वाढ झाली आहे. त्याबरोबर पालिकेच्या सध्याच्या खर्चाच्या तुलनेत विद्यमान स्रोतातून प्राप्त होणाऱ्या उत्पन्नात वाढ होण्याची गरज आहे. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला असल्याचे पालिकेच्या वतीने या प्रस्तावात नमूद करण्यात आले आहे.