भीमा कोरेगावला भव्य स्मारक उभारावे
केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांचे प्रतिपादन
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १ : भीमा कोरेगाव येथे ५०० शूर सैनिकांनी पेशव्यांच्या २८ हजार सैन्याला पराभूत करण्याचा पराक्रम केला. त्या पूर्वजांची शौर्यगाथा जिवंत ठेवण्याचे काम करायचे आहे. त्यामुळे भीमा कोरेगाव येथे भव्य राष्ट्रीय स्मारक उभारण्यासाठी प्रयत्नशील राहू, असे रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी सांगितले. शनिवारी (ता.१) शौर्यदिनानिमित्त आठवले यांनी भीमा कोरेगाव येथे ऐतिहासिक विजय स्तंभास विनम्र अभिवादन केले.
भीमा कोरेगाव येथील ऐतिहासिक विजयस्तंभ परिसरातील शंभर एकर जमीन संपादित करून भव्य राष्ट्रीय स्मारक उभारावे. त्यासाठी केंद्र सरकारच्या वतीने ५० ते १०० कोटींचा निधी मिळविण्याचा प्रयत्न राहील. राज्य सरकारने १०० कोटींचा आराखडा तयार केला आहे. त्यामुळे राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या संयुक्त विद्यमाने भीमा कोरेगाव ऐतिहासिक विजय स्तंभ येथे भव्य स्मारक उभरण्याचा प्रयत्न करणार असल्याचे आठवले म्हणाले. ५०० शूर सैनिकांच्या महापराक्रमाच्या शौर्याचे प्रतीक म्हणून विजयस्तंभ उभारले. या विजयस्तंभाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर दरवर्षी अभिवादन करण्यास येत असत. १९८० मध्ये भारतीय दलित पँथरच्या माध्यमातून भीमा कोरेगाव येथे अभिवादन सभा घेण्याची सर्वप्रथम सुरुवात केली. अलीकडच्या काळात भीमा कोरेगाव येथे दरवर्षी लाखो लोक येऊ लागले आहेत, याचा अभिमान आहे, असेही आठवले म्हणाले.