टीबी रुग्णांच्या संपर्कातील कुटुंबीयांची तपासणी
पालिकेची शहरातील २४ वार्डमध्ये मोहिमेस सुरुवात
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १ : मुंबईतील टीबी रुग्णांचा वेगाने शोध सुरू केला जाणार आहे. यापुढे पालिका टीबी रुग्णांच्या संपर्कातील कुटुंबीयांची टीबीची तपासणी करणार आहे. नववर्षाच्या सुरुवातीला पालिकेची ही मोहीम सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला असून सोमवारपासून मुंबईतील २४ वॉर्डमध्ये मोहिमेला प्रारंभ होणार आहे. पालिका फुप्फुसाचा क्षयरोग असलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांची अनिवार्य तपासणी सुरू करणार आहे.
मुंबईतील घरांमधील सुप्त क्षयरोग संसर्ग लवकर शोधण्यासाठी पालिका प्रथमच ३ जानेवारीपासून सक्रिय फुप्फुस क्षयरोग (टीबी) रुग्णांच्या कुटुंबातील सदस्यांची अनिवार्य तपासणी सुरू करत आहे. या मोहिमेमुळे टीबी रुग्णांचा भार निम्मा होण्यास मदत होईल. पालिकाने यापूर्वी प्रायोगिक तत्त्वावर प्रकल्प सुरू केला होता. ज्यात सुप्त क्षयरोगी शोधण्यासाठी १२५ टीबी रुग्णांच्या कुटुंबातील सदस्यांचे सुमारे ५०० नमुने गोळा केले गेले. मुंबईत टीबीच्या दोन तृतीयांश रुग्णांना फुप्फुसाचा संसर्ग आहे. या अंतर्गत, क्षय रुग्णांच्या जवळच्या संपर्कातील कुटुंबीयांची तपासणी केली जाईल. यात प्रामुख्याने खोकला, ताप, वजन कमी होणे आणि रात्री घाम येणे ही लक्षणे तपासली जातील.
टीबी नियंत्रण विभागाच्या प्रमुख आणि पालिकेच्या उपकार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. प्रणिता टिपरे यांनी सांगितले की, टीबी रुग्णांच्या संपर्कात आल्याने बऱ्याचदा नातेवाईकांनाही संसर्ग होतो. हीच लक्षणे तपासण्यासाठी इग्रा ही चाचणी केली जाणार आहे. इग्रा म्हणजे इंटरफेरॉन-गामा रिलीझ. यात मायकोबॅक्टेरियम तपासण्यासाठी एक्स-रे, रक्ततपासणी केली जाईल. यात कोणाचे बॅक्टेरिया पॉझिटिव्ह आढळले, तर आम्ही त्यांचे रोगप्रतिबंधक उपचार सुरू करू. जेणेकरून त्यांच्यामध्ये बॅक्टेरिया सक्रिय होणार नाहीत, असेही डॉ. टिपरे यांनी सांगितले.
चौकट ---------
लहान मुलांची स्क्रीनिंग चाचणी
आतापर्यंत, ही टीबी प्रतिबंधात्मक थेरेपी केवळ पाच वर्षांखालील मुलांवर केली जात होती, जे घरातील इतर सक्रिय क्षयरोगाच्या संपर्कात आले होते. पीएमटीपीटी म्हणजेच प्रोग्रामॅटिक मॅनेजमेंट ऑफ टीबी प्रिव्हेंटिव्ह थेरेपी असे या कार्यक्रमाचे नाव असेल. लहान मुलांची ही स्क्रीनिंग चाचणी आम्ही करतोय आणि त्यांनाही औषध देत आहोत. सोमवारपासून जे टीबी रुग्ण आहेत त्यांच्या घरी जाऊन त्यांच्या नातेवाईकांची चाचणी करणार आहोत, असेही डॉ. टिपरे यांनी सांगितले.