थर्डी फर्स्टला झोमॅटोचे ''अच्छे दिन''
दिवसभरात २० लाखांहून अधिक ऑर्डर
नवी दिल्ली, ता. १ : देशातील कोरोनाबाधितांची संख्या वाढल्याने हॉटेल, रेस्टॉरंट सुरू ठेवण्यावर आणि आसन क्षमतेवर बंधने आली आहेत. मात्र, ऑनलाईन फूड डिलिवरीला मात्र थर्टी फर्स्टच्या निमित्ताने ''अच्छे दिन'' आल्याचे दिसले. ऑनलाईन फूड डिलिवरी करणाऱ्या झोमॅटोला ३१ डिसेंबरला एकाच दिवसात तब्बल २० लाख (२ मिलियन) ऑर्डर मिळाल्या. झोमॅटोचे संस्थापक दीपिंदर गोयल यांनी ट्विट करत ही माहिती दिली.
वर्षाच्या अखेरीस झोमॅटोला ऑनलाईन फूड डिलिवरीच्या मोठ्या ऑर्डर मिळाल्या. गोयल यांनी दिलेल्या माहितीनुसार शुक्रवारी रात्री ९ वाजता झोमॅटोने एकाच दिवसात २० लाख ऑर्डर स्वीकारल्या आणि त्याही पुढे नव्या ऑर्डर मिळतच होत्या. या संपूर्ण ऑर्डरची किंमत जवळपास ९१ कोटी रुपयांवर गेली. दीपिंदर गोयल यांनी ट्विट केले की, आम्ही दोन मिलियन ऑर्डर पार केल्या आहेत. एका दिवसात मिळालेल्या ऑर्डरची ही पहिलीच वेळ आहे आणि अद्यापि दिवस संपायला तीन तास बाकी आहेत. एका दुसऱ्या ट्विटमध्ये गोयल यांनी आपल्या टीम सोबत ऑर्डर ट्रक करत असल्याचा फोटो शेअर केला. नुकतेच झोमॅटोने फूड डिलिवरीचा वार्षिकी अहवाल सादर केला होता. ज्यात भारतात २०२१ मध्ये बिर्याणीला सर्वाधिक पसंती मिळाल्याचे दर्शवले गेले, दर दोन सेकंदाला झोमॅटोवरून बिर्याणीची ऑर्डर नोंदवली गेली होती.