महापालिकेची करातून विक्रमी कमाई
इमारत बांधकाम, मालमत्ता करातून १४ हजार कोटींचे उत्पन्न
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १ : कोविड काळातही मुंबई महानगरपालिकेने उत्पन्नाचे विक्रम प्रस्थापित केले. या वर्षअखेर पालिकेला मालमत्ता करातून अपेक्षेपेक्षा तब्बल चौपट म्हणजेच तीन हजार कोटींचा महसूल मिळाला; तर इमारत बांधकाम परवानगीच्या प्रीमियममधून विक्रमी ११ हजार कोटी रुपयांची वसुली झाली. या आर्थिक वर्षात पालिकेने २७ हजार ८११ कोटी रुपयांचे महसुली उत्पन्न अंदाजित केले होते; मात्र आर्थिक वर्ष संपण्यापूर्वीच महानगरपालिकेने या दोन विभागांतून संपूर्ण महसुली उत्पन्नाच्या ५० टक्के उत्पन्न वसूल केले.
पालिकेला या आर्थिक वर्षात मालमत्ता करातून पाच हजार १३५ कोटींचे उत्पन्न मिळणे अपेक्षित आहे; तर डिसेंबरअखेरपर्यंत ८१० कोटी रुपयांच्या उत्पन्नाची अपेक्षा होती; मात्र डिसेंबरअखेरपर्यंत पालिकेने तीन हजार ४०० कोटी रुपयांची वसुली केली, अशी माहिती पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी दिली. त्याचबरोबर इमारत बांधकाम परवानगीच्या प्रीमियम शुल्काची वसुलीही ११ हजार कोटीपर्यंत झाली; तर मार्चअखेरपर्यंत ही वसुली १२ हजार कोटी रुपये होण्याचा अंदाज असल्याचे आयुक्तांनी नमूद केले. सर्वसामान्य वर्षात महानगरपालिकेला प्रीमियममधून चार हजार कोटी रुपयांपर्यंतचे उत्पन्न मिळते. या वर्षी कोविडच्या पार्श्वभूमीवर पालिकेने विकसकांना प्रीमियम शुल्कात ५० टक्के सूट दिली होती. त्यामुळे उत्पन्नात वाढ झाली आहे.
सूट देण्याच्या निर्णयावर सुरुवातील टीका झाली होती; मात्र मिळालेल्या उत्पन्नातून हा निर्णय योग्य असल्याचे स्पष्ट झाले आहे, असे स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी नमूद केले. महानगरपालिकेने ही सूट मिळण्यासाठी विकासकांना पूर्वीची थकबाकी भरणे बंधनकारक केले होते.
चौकट
------
घरांच्या किमतीवरही परिणाम
राज्य सरकारने प्रीमियममध्ये सूट देण्याचा निर्णय घेतला होता. त्याचे सकारात्मक परिणाम आता दिसत आहेत. फक्त पालिकेचेच उत्पन्न वाढले नाही, तर घरांच्या किमतींवरही चांगला परिणाम झाला, असे राज्याचे नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी नमूद केले.