मुंबईकरांना नववर्षात करमाफीची भेट!
५०० चौरस फुटांपर्यंतच्या घरांना करात सूट; मुख्यमंत्र्यांची घोषणा
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १ : कोरोनाचे सावट असलेल्या नववर्षात मात्र पालिकेने मुंबईकरांना मोठा दिलासा दिला आहे. नववर्षाच्या सुरुवातीलाच मुंबईतील ५०० चौरस फुटांपर्यंतच्या घरांना संपूर्ण करमाफीचा निर्णय शनिवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केला. तब्बल १६ लाख १४ हजार मालमत्ता धारकांना या निर्णयाचा लाभ मिळणार असून पालिकेला मात्र ४६२ कोटींच्या महसुलावर पाणी सोडावे लागणार आहे. २०२२-२३ या वर्षापासून ही सूट लागू होईल.
महापालिकेच्या २०१७ च्या निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेने मुंबईतील ५०० चौरस फुटांपर्यंतच्या घरांना करमाफीचे आश्वासन दिले होते. त्यानुसार तीन वर्षांपूर्वी मालमत्ता कर माफ करण्याचा निर्णयही झाला; मात्र प्रत्यक्षात मालमत्ता करातून सर्वसाधारण कर माफ करण्यात आला. उर्वरित उपकरांची वसुली होतच होती. त्यावरून बरीच टीकाही झाली; मात्र नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी मुख्यमंत्र्यांनी ५०० फुटांपर्यंतच्या सर्व घरांना संपूर्ण करमाफीची घोषणा केल्याने सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. याबाबत लवकरच अध्यादेश प्रसिद्ध करण्यात येणार असल्याचे राज्य सरकारने सांगितले.
फेसबुक लाईव्हद्वारे मुख्यमंत्र्यांनी या निर्णयाची घोषणा केली. या वेळी नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे, मुंबई शहराचे पालकमंत्री अस्लम शेख, उपनगराचे पालकमंत्री आदित्य ठाकरे, महापौर किशोरी पेडणेकर, पालिका आयुक्त डॉ. इक्बाल सिंह चहल, नगरविकास विभागाचे प्रधान सचिव महेश फाटक उपस्थित होते. शिवसेनेने निवडणुकीत दिलेले वचन पूर्ण केल्याचे या वेळी एकनाथ शिंदे यांनी नमूद केले.
चौकट -----
उपकरांचा पेच
शिक्षण, रोजगार आणि वृक्ष उपकर वेगवेगळ्या कायद्यानुसार मालमत्ता कर पत्रिकेत समाविष्ट करण्यात आलेले आहेत. त्यामुळे त्या कायद्यांमध्येही सुधारणा करावी लागणार आहे. या उपकरांबाबत स्वतंत्र निर्णय घ्यावा लागणार आहे.
कोट----
शिवसेना फक्त तोंडातून वाफा काढत नाही, तर प्रत्यक्ष कृती करते. मुंबईवर संकट आल्यावर विरोधकांना शोधावे लागते.
- उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री
------चौकट --------
वेळ पडल्यास कोविडवर बोलेन!
मुख्यमंत्री म्हणाले, की ‘टीव्हीवर दिसलो तर कोविडवर बोलायला आलो आहे असे नागरिकांना वाटते, पण आज कोविडवर बोलायला आलेलो नाही, पण वेळ पडली तर पुन्हा कोविडवर बोलावे लागेल, असे मुख्यमंत्र्यांनी नमूद केले.